पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू पहिली भारतीय खेळाडू ठरली. या उत्तुंग कामगिरीमुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश सोबत भारतीय पथकाच्या ध्वजवाहकाचा मान मिळाला होता.मनूने पहिला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यानंतर तिने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसोबत दुसरे कांस्य पटकावले.
आता मनू भाकरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. तिने तीन महिन्यांचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतून ती बाहेर पडू शकते. मनूचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी ही माहिती दिली. 13 ते 18 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत नेमबाजी विश्वचषक स्पर्धा होणार आहे.
जसपाल यांनी पीटीआयला सांगितले की, ‘मनू भाकर तीन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याने ती ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकात खेळेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. ऑलिम्पिकसाठी ती खूप दिवसांपासून मेहनत करत होती. तिला एका दिर्घ ब्रेकची गरज आहे. त्यामुळे हा एक सामान्य ब्रेक असेल. ब्रेकनंतर मनू 2026 च्या आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी सज्ज होईल.’
महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात मनूला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने एकाच ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅटट्रिक साधण्याची तिची संधी थोडक्यात हुकली. अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत मनू भाकरने काही वेळ अव्वल क्रमांकावर मजल मारली होती, पण तिला आपल्या कामगिरीत सातत्य राखता न आल्याने मनूची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली.
मनूने तीन सीरिजमध्ये 10 गुण घेताना दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. पण चौथ्या सीरिजनंतर मनूची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आणि ती व्हिएतनामच्या खेळाडूसह 13 गुणांसह बरोबरीत राहिली. पाचव्या सीरिजमध्ये मनूने पाच अचूक लक्ष्य भेदून जबरदस्त पुनरागमन केले. ती 18 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आली. हंगेरियाची मेजोर व्हेरॉनिका 19 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. सहाव्या सीरिजमध्ये मनूने पाचपैकी चार शॉट्स अचूक साधले आणि 22 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पण अन्य नेमबाजांकडून तिला कडवी टक्कर मिळत होती.
फ्रान्सची कॅमिल आणि मेजॉर यांचे कडवे आव्हान मनूसमोर असताना तिने सातव्या सीरिजमध्ये पुन्हा एकदा पाचपैकी चार शॉट्स अचूक मारून दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली होती. पण, फ्रान्सची कॅमिल २६ गुणांसह मनूसह बरोबरीत होती. कोरियाची यांग जिन २७ गुणांसह अव्वल स्थानी होती. आठव्या सीरिजमध्ये मनूचे दोन शॉट्स चुकले आणि ती २८ गुणांसह तिसऱ्या स्थानी फेकली गेली. यावेळी हंगेरीच्या मेजॉर व्हेरॉनिका (२८) हिच्यासह झालेल्या शूट-ऑफमध्ये मनूला कामगिरी उंचावता आली नाही. शूट-ऑफमध्ये मनूचे पाचपैकी तीन शॉट्स अचूक लागले तर व्हेरोनिकाने चार वेळा अचूक लक्ष्यभेद करत कांस्यपदकाला गवसणी घातली.