

गुवाहाटी; वृत्तसंस्था : बीडब्ल्यूएफ वर्ल्ड ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताची अव्वल मानांकित तन्वी शर्मा हिने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत आपले पहिले जागतिक पदक निश्चित केले. मात्र उन्नती हुडाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
16 वर्षीय तन्वीने जपानच्या साकी मात्सुमोटो हिच्यावर तीन गेमच्या संघर्षपूर्ण सामन्यात 13-15, 15-9, 15-10 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावूनही तिने दमदार पुनरागमन केले. या वर्षीच्या यूएस ओपन सुपर 300 स्पर्धेची ती उपविजेती ठरली होती. या विजयामुळे तन्वीने भारतासाठी किमान कांस्यपदक निश्चित केले आहे. उन्नती हुडाची उपांत्यपूर्व फेरीत आठवी मानांकित उन्नती हुडा थायलंडच्या दुसर्या मानांकित अन्यापत फिचितफॉनकडून 12-15, 13-15 अशी पराभूत झाली. सामना 32 मिनिटे चालला उन्नतीने 2022 ओडिशा ओपनमध्ये सुपर 100 किताब जिंकला होता. ती भारताच्या 2022 उबेर कप संघाचाही भाग होती. तन्वी आता उपांत्य फेरीत उतरून रंगतदार लढत देण्यास सज्ज असून तिच्याकडून आणखी मोठ्या अपेक्षा आहेत.