

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू क्रिस गेल आणि शाकिब अल हसन यांच्यासह सुमारे ३२ खेळाडूंना घेऊन श्रीगनरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'इंडियन हेवन प्रीमियर लीग' (IHPL) मध्ये मोठी फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या लीगमध्ये सहभागी होण्यासाठी हे सर्व खेळाडू श्रीगनरला पोहोचले होते, परंतु २ नोव्हेंबर रोजी स्पर्धेचे आयोजकच हॉटेल सोडून पसार झाल्याचे समोर आले आहे.
आयोजकांनी हॉटेलसह इतर कोणत्याही खर्चाचे एक रुपयाचेही पेमेंट केलेले नाही. याचा थेट परिणाम म्हणून, हॉटेलचे बिल थकल्याने या सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबावे लागले आहे. त्यांना चेकआऊट करून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली. माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खेळाडू मिळून या लीगमध्ये एकूण सुमारे ७० खेळाडू सहभागी झाले होते.
'इंडियन हेवन प्रीमियर लीग'ची सुरुवात २५ ऑक्टोबर रोजी झाली होती आणि यात क्रिस गेल (वेस्ट इंडिज), शाकिब अल हसन (बांगला देश), तिसारा परेरा (श्रीलंका) यांसारखे अनेक नामवंत माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सहभागी झाले होते.
स्पर्धा व्यवस्थित सुरू असतानाच, २ नोव्हेंबरच्या रात्री लीगचे आयोजक कोणालाही काहीही न सांगता अचानक गायब झाले. आयोजकांनी हॉटेलपासून ते इतर कोणत्याही गोष्टीचे बिल न भरल्याने सर्व खेळाडू हॉटेलमध्ये अडकून पडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस गेल मात्र १ नोव्हेंबरलाच हॉटेलमधून चेकआऊट करून निघाला होता, पण बाकीचे खेळाडू तिथेच अडकले होते. या स्पर्धेत पंच म्हणून भूमिका बजावणाऱ्या मेलिसा जुनिपर यांनी सांगितले की, आयोजक हॉटेल सोडून गेले आहेत. सर्व खेळाडू आणि पंचांनी मिळून हॉटेल प्रशासनाशी समझोता केला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या घरी परतणे शक्य झाले. रेसिडेन्सी हॉटेलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयोजकांनी सुमारे १० दिवसांपूर्वी जवळपास १५० खोल्या बुक केल्या होत्या.