

विशाखापट्टणम : ‘आयसीसी’ महिला वन-डे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने 2 सामन्यांत 2 विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले असले, तरी अव्वल फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघासमोर चिंतेची छटा आहे. भारतीय महिला संघाची आज (गुरुवार दि. 9) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साखळी लढत होत असून, येथे प्रामुख्याने स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स या त्रिकुटाकडून अधिक आक्रमक खेळाचे प्रदर्शन अपेक्षित आहे. या लढतीला दुपारी 3 पासून प्रारंभ होईल.
दक्षिण आफ्रिकेसारख्या अधिक सक्षम संघासमोर हीच परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास भारतासाठी ती आपत्तिमय ठरू शकते. त्यामुळे या महत्त्वाच्या लढतीत भारताच्या या स्टार त्रयीकडून भरीव योगदानाची संघाला नितांत गरज आहे. या सामन्यात विजय न मिळाल्यास भारताचे गुणतालिकेतील दुसरे स्थान धोक्यात येईल, तसेच 12 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्या अंतिम साखळी सामन्यापूर्वी संघावर अतिरिक्त दबाव येईल.
भारतीय व्यवस्थापनासाठी एक सकारात्मक बाब म्हणजे, स्टार फलंदाजांच्या मोठ्या योगदानाशिवायही संघाने विजय मिळवला आहे. ही बाब संघातील अनेक ‘मॅच-विनर्स’च्या अस्तित्वाचा संकेत देते. परंतु, दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियासारख्या अव्वल संघांविरुद्ध ‘चांगल्या’ आणि ‘विजयी’ धावसंख्येतील फरक मानधना, हरमनप्रीत आणि रॉड्रिग्स यांच्या बॅटमधून निघणार्या धावांवर अवलंबून असेल, हे व्यवस्थापन निश्चितपणे मान्य करेल.
फलंदाजांनी निराश केले असले, तरी भारतीय गोलंदाजांनी मात्र सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दीप्ती शर्मा सहा बळींसह सर्वाधिक बळी घेणार्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तिला स्नेह राणा, फिरकीपटू श्री चरणी आणि वेगवान गोलंदाज क्रांती गौड यांची उत्तम साथ मिळाली आहे. मात्र, विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमची खेळपट्टी गुवाहाटी आणि कोलंबोमधील ट्रॅकसारखी गोलंदाजांना तितकीशी साथ देणारी नसेल, याची जाणीव गोलंदाजांना ठेवावी लागेल.
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध 6 गडी राखून विजय मिळवत उत्कृष्ट पुनरागमन केले आहे. त्यापूर्वी त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. शतकवीर ताझमिन ब्रिट्स आणि अनुभवी सुने लूस पुन्हा फॉर्मात आल्या आहेत. कर्णधार लॉरा वोलव्हार्ड्ट आणि अनुभवी मरिझान कॅप व अनेके बॉश यांच्याकडूनही संघाला मोठ्या योगदानाची अपेक्षा असेल. नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, कॅप, मासाबाटा क्लास आणि क्लो ट्रायॉन या अनुभवी गोलंदाजी फळीने आपला अनुभव पणाला लावल्यास, भारतीय फलंदाजीसाठी हे आव्हान कठीण असेल.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावळ, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, उमा छेत्री, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड.
लॉरा वोलव्हार्ड्ट (कर्णधार), अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नदिन दे क्लर्क, मरिझान कॅप, ताझमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, अनेरी डर्कसन, अनेके बॉश, मासाबाटा क्लास, सुने लूस, कराबो मेसो, तुमी सेखुखुने, नॉनडुमिसो शांगासे.
गुवाहाटी आणि कोलंबोमध्ये झालेल्या पहिल्या दोन सामन्यांत भारताने अनुक्रमे श्रीलंका आणि पाकिस्तानवर विजय मिळवला असला, तरी मानधना, हरमनप्रीत आणि रॉड्रिग्स या स्टार फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही. श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांत या त्रयीच्या अपयशानंतर हरलीन देओल, अमनजोत कौर, रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांच्यासारख्या दुसर्या फळीतील फलंदाजांच्या समयोचित योगदानामुळे भारताने विजय खेचून आणला होता. मात्र, यादरम्यान, आघाडी फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे भारताची श्रीलंकेविरुद्ध 6 बाद 124 आणि पाकिस्तानविरुद्ध 5 बाद 159 अशी बिकट स्थिती झाली होती, हे येथे लक्षवेधी आहे.
संघाचे लक्ष वेगवान गोलंदाज-अष्टपैलू अमनजोत कौरच्या तंदुरुस्तीकडे असेल. यापूर्वी प्रकृती अस्वास्थामुळे ती पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकली नव्हती. ती तंदुरुस्त असल्यास, तिला रेणुका सिंग ठाकूरच्या जागी अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते. तळाच्या क्रमवारीत अमनजोत उपयुक्त फलंदाज म्हणूनही लक्षवेधी योगदान देऊ शकते.
सामन्याची वेळ : दुपारी 3 पासून.