पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या स्थानात घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत नऊ विकेट्स घेतल्याने त्याचा फायदा झाला आहे. याशिवाय त्याने कसोटीत 300 बळींचा टप्पा गाठला. ( ICC Test Rankings)
भारतीय संघाची युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालला फलंदाजांच्या क्रमवारीत फायदा झाला आहे. तो पहिल्या तीनमध्ये परतला असून तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
रबाडा यापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये अग्रस्थानी होता. तेव्हापासून सातत्याने अव्वल 10 मध्ये राहिला आहे, फक्त फेब्रुवारी 2019 मध्ये तो पहिल्या दहामध्ये नव्हता. आता हेजलवूड आता दुसऱ्या तर बुमराह आणि अश्विन अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
भारताचे फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत फटका बसला आहे. तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रवींद्र जडेजाची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या नोमान अलीने अव्वल दहा गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. याशिवाय न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने आठ स्थानांची झेप घेत फलंदाजांच्या क्रमवारीत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
ऋषभ पंत आणि विराट कोहली कसोटी क्रमवारीत टॉप-10 च्या यादीतून बाहेर पडले आहेत. पंतने पाच स्थान गमावले असून तो आता टॉप-10 मधून बाहेर पडला असून, तो थेट 11व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. विराट कोहलीनेही सहाव्या स्थानी होता. तो आता 688 च्या रेटिंगसह 14 व्या क्रमांकावर गेला आहे. इंग्लंडचा जो रूट फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे.