पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट खेळातील शिखर संस्था असणार्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता पुरुष क्रिकेटपटूंएवढेच महिला क्रिकेटपटूंना बक्षीसाची रक्कम (Prize Money) दिली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणार्या महिला T-20 विश्वचषक स्पर्धेपासून ( Women T20 World Cup )या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. महिला T-20 विश्वचषक स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम 7,958,080 यूएस डॉलर (सुमारे 66 कोटी 70 लाख रुपये) असणार आहे.
मागील वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धांचा विचार करता बक्षिसाच्या रक्कमेत तब्बल २२५ टक्के वाढ झाली आहे. मागील T-20 विश्वचषक स्पर्धेवेळी ही रक्कत केवळ २४ लाख ५० हजार डॉलर होती. 'आयसीसी'ने म्हटलं आहे की, महिला T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला आता 23 लाख 40 हजार अमेरिकन डॉलर्स बक्षीस रुपी मिळणार आहेत. मागील वर्षी T20 विश्वचषक जिंकणार्या ऑस्ट्रेलिया संघाला एक दशलक्ष डॉलर बक्षीस रक्कम मिळाली होती. तर भारतीय पुरुष संघाला यंदाच्या T20 विश्वचषकाचा विजेता बनल्याबद्दल 24 लाख 50 हजार डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळाली आहे.
विश्वचषक पुरुष आणि महिलांसाठी समान बक्षीस रक्कम देणारा क्रिकेट हा पहिला खेळ बनला आहे. महिला टी-20 विश्वचषकाच्या उपविजेत्या संघाला तब्बल ११ लाख ७० हजार डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना ६ लाख ७५ हजार डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे.
महिला T20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारतीय महिला संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध ४ ऑक्टोबरला होणार आहे. 6 ऑक्टोबरला भारतीय संघटड कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात मैदानात उतरेल. तर ९ ऑक्टोबरला श्रीलंकेबरोबर सामना होईल. आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. आता या पराभवाची परतफेड करण्याची संधी टीम इंडियाकडे असेल. तर टीम इंडियाचा साखळी सामन्यात शेवटचा मुकाबला १३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारताच्या पुरुष क्रिक्रेट संघाने T-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषक पटकावला होता. आता महिला संघही अशीच कामगिरी करणार का, याकडे देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे.