सरफराज-जुरेल वेटिंगवर, बांगलादेशविरुद्ध तीन फिरकीपटू खेळवणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : ध्रुव जुरेल आणि सरफराज खान या युवा खेळाडूंना टीम इंडियाकडून कसोटी खेळण्यासाठी संधीची प्रतीक्षा करावी लागले, असे स्पष्ट करत बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या संघात तीन फिरकीपटूंना स्थान मिळेल, असे संकेत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आज (दि. १८ सप्टेंबर ) पत्रकार परिषदेत दिले.
खेळाडूंनी अतिआत्मविश्वास टाळवा
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवार (दि.१९ सप्टेंबर) पासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीर म्हणाले की, खेळाडूंच्या खेळण्याची सर्वोत्तम शैली ही संघाला जिंकण्यास मदत करते. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळाडूंना अतिआत्मविश्वास टाळणे गरजेचे आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर बांगलादेशचा संघाचा आत्मविश्वासाने वाढला आहे. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडू त्यांना ग्रहित धरुन मैदानात उतरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अश्विन-जडेजा फिरकी जोडी संघाचे बलस्थान
भारतीय क्रिकेट संघात समावेश असणार्या अनेक खेळाडूंसोबत मी क्रिकेट खेळलो आहे. माझे संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंशी चांगले संबंध आहेत. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या सारखी फिरकी जोडी संघाचे बलस्थान असल्याचेही गंभीर यांनी या वेळी नमूद केले.
भारत तीन फिरकीपटूंना खेळवू शकतो
संघात केवळ 11 खेळाडू खेळू शकतात, असे स्पष्ट करत गंभीर म्हणाले की, युवा क्रिकेटपटू सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना संधीची प्रतीक्षा करावी लागेल. त्याचबरोबर भारतीय संघात तीन फिरकीपटूंचा समावेश केला जावू शकतो, असे सांगत आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यांचा संघात समावेश असेल, असे संकेतही गंभीर यांनी दिली.
द. आफ्रिकेतील खेळपट्टीवर कोणी काहीच बोलले नव्हते
भारतातील खेळपट्ट्यांबाबत चिंता व्यक्त करणार्यांना गंभीर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "जेव्हा भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत गेला तेव्हा कसोटी सामना दोन दिवसांत संपला हाेता. यावर कोणी काहीच बोलले नव्हते; पण भारतीय खेळपट्ट्यांबाबत मुद्दा उपस्थित केला जात आहे."
फिरकीचा मुकाबला करायसाठी भारताची फलंदाजी सक्षम
जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. आम्ही आता भारतातील वेगवान गोलंदाजांबद्दल बोलत आहोत हे चांगले आहे. कारण आपल्याकडे फलंदाजांवर अधिक चर्चा हाेते. आमची फलंदाजी इतकी सक्षम आहे की, ती कोणत्याही फिरकी युनिटला तोंड देऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतसारखा खेळाडू असणे संघात असणे चांगलेच
ऋषभ पंत याने यष्टिरक्षक म्हणूनही चमकदार कामगिरी केली आहे. संघासाठी तो किती भरीव कामगिरी करु शकतो हे सर्वांना माहीत आहे. त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे चांगले असते, असे सांगत बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात पंतच यष्टिरक्षण करणार असून, केएल राहुलचा समावेश फलंदाज हाेईल, असे संकेतही गंभीर यांनी दिले.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताचे संभाव्य प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) , केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.