

गुवाहाटी; वृत्तसंस्था : महिलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात इंग्लंडने बांगला देशचा चार गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी बांगला देशला 178 धावांवर रोखले आणि नंतर हे लक्ष्य 46.1 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा करत पूर्ण केले. कर्णधार हेदर नाईट हिने 79 धावांची नाबाद खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगला देशची 59 धावांत 3 गडी अशी बिकट अवस्था झाली होती. मात्र, शोभना मोस्टारी हिने 108 चेंडूंमध्ये संयमी 60 धावांची खेळी करत एक बाजू सावरली. तरीही, दुसर्या बाजूने नियमित अंतराने बळी पडत राहिले. शेवटच्या फळीतील राबिया खान हिने 27 चेंडूंमध्ये एक षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने झटपट 43 धावांची खेळी करून संघाच्या धावसंख्येला काहीशी प्रतिष्ठा मिळवून दिली. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोन हिने सर्वाधिक 3 बळी (24 धावांत) घेतले, तर चार्ली डीन (2/28), लिन्सी स्मिथ (2/33), लॉरेन बेल (1/28) आणि लिस कॅप्सी (2/31) यांनीही बळी मिळवत तिला चांगली साथ दिली. बांगला देशकडून फाहिमा खातून हिने 16 धावांत 3 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली.