पुढारी ऑनलाईन डेस्क : दुलीप ट्रॉफी 2024 च्या दुस-या फेरीच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत डी संघाची स्थिती सध्या खूपच वाईट आहे. खराब फलंदाजीमुळे भारत डी संघ या सामन्यात खूप मागे पडला असून ते पराभवाच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. भारत अ संघाने पहिल्या डावात 290 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत ड संघ केवळ 183 धावा करू शकला.
भारत डीची फलंदाजी फारशी चांगली झाली नाही. खलील अहमद आणि आकिब खान यांच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर संघ केवळ 183 धावांवर गारद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर 7 चेंडूंचा सामना करून खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनलाही विशेष काही करता आले नाही. त्याने 6 चेंडूत केवळ 5 धावा केल्या. भारत डी तर्फे देवदत्त पडिक्कलने सर्वोत्तम खेळी खेळली. त्याने 124 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. त्याला खालच्या फळीतील हर्षित राणाने चांगली साथ दिली. राणाने 29 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. भारत अ संघाकडून खलील अहमद आणि आकिब खान यांनी 3-3 बळी घेतले.
पहिल्या डावाच्या जोरावर भारत अ संघाला 107 धावांची आघाडी मिळाली आहे. तसेच संघाने आपल्या दुसऱ्या डावात 1 गडी गमावून 115 धावा केल्या आहेत. भारत अ संघाने दुसऱ्या डावातही चांगली सुरुवात केली. कर्णधार मयंक अग्रवाल आणि प्रथम सिंग या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 115 धावांची शानदार भागीदारी केली. मयंक अग्रवालने 87 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. शेवटच्या सत्रात भारत डी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या पहिल्याच चेंडूवर मयंकची विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सलामीवीर प्रथम सिंग 59 धावा करून क्रीझवर राहिला. अशाप्रकारे भारत डी संघावर पराभवाची टांगती तलवार आहे, असे स्पोर्ट्सकीडा या वेबसाईटच्या बातमीत म्हटले आहे.