

ओडेन्से (डेन्मार्क); वृत्तसंस्था : भारताचे अव्वल दुहेरीचे खेळाडू सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आजपासून (मंगळवार, दि. 14) खेळवल्या जाणार्या 9 लाख 50 हजार बक्षीस रकमेच्या डेन्मार्क ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत हंगामातील पहिले जेतेपद मिळवण्यासाठी महत्त्वाकांंक्षी असतील. या वर्षात सात्त्विक व चिराग यांना विजयश्रीने सातत्याने हुलकावणीही दिली असून येथे तरी ते ही कसर भरून काढू शकणार का, इतकीच उत्सुकता असेल.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या या सहाव्या मानांकित जोडीचा पहिला सामना स्कॉटलंडच्या ख्रिस्तोफर ग्रिमली आणि मॅथ्यू ग्रिमली यांच्याशी होईल. सात्त्विक आणि चिराग यांनी या हंगामात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी हाँगकाँग आणि चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धांमध्ये सलग अंतिम फेरी गाठली, तसेच पॅरिसमध्ये दुसरे जागतिक कांस्यपदक पटकावले आहे.
पुरुष एकेरीत, जागतिक क्रमवारीत 28 व्या क्रमांकावर असलेला आयुष शेट्टी सलामीच्या फेरीत फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्ह याचा सामना करेल. जागतिक क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर असलेला लक्ष्य सेन आयर्लंडच्या न्हाट गुयेन विरुद्ध खेळेल. 2020 ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर फॉर्म गमावलेल्या 2021 च्या जागतिक कांस्यपदक विजेत्या लक्ष्यने सप्टेंबरमध्ये हाँगकाँग सुपर 500 स्पर्धेत उपविजेतेपद मिळवत आपला फॉर्म पुन्हा प्राप्त केला होता. मात्र, नुकत्याच जपानच्या कोदाई नाराओका आणि वितिदसर्नविरुद्ध झालेल्या पराभवामुळे त्याच्या कामगिरीतील सातत्याची गरज अधोरेखित झाली आहे.
महिला दुहेरीत ऋतुपर्णा पांडा आणि श्वेतपर्णा पांडा स्कॉटलंडच्या ज्युली मॅकफर्सन आणि सियारा टॉरेन्स यांचा सामना करतील. तर, कविप्रिया सेल्वम आणि सिमरन सिंघी या बल्गेरियाच्या गॅब्रिएला आणि स्टेफानी स्टोएवा यांच्याशी दोन हात करतील. महिला एकेरीत युवा शटलर अनमोल खरब हिचा सलामीचा सामना इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा हिच्याशी होईल.