विराट कोहलीला तिसर्‍या कसोटीत द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी | पुढारी

विराट कोहलीला तिसर्‍या कसोटीत द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी

केपटाऊन ; वृत्तसंस्था : पाठीच्या दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहलीला दुसर्‍या कसोटीतून माघार घ्यावी लागली होती. त्याच्या जागी के. एल. राहुलला संघात स्थान देण्यात आले होते. परंतु, तिसर्‍या आणि निर्णायक कसोटीत मात्र विराट संघाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे.

14 केपटाऊन कसोटीत विराट कोहलीला एक मोठा विक्रम खुणावतो आहे. दक्षिण आफ्रिकेत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या खेळाडूंच्या यादीत विराट सध्या तिसर्‍या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने तिसर्‍या कसोटीत 14 धावा केल्या तर या खेळाडूंच्या यादीत विराट दुसर्‍या क्रमांकावर जाऊ शकतो.

06 विराटने आतापर्यंत आफ्रिकेत सहा कसोटी खेळल्या असून, त्यात 51 च्या सरासरीने 611 धावा केल्या आहेत. यात 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीत विराटला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या डावात 35 आणि दुसर्‍या डावात 18 अशा त्याच्या दोन्ही खेळी होत्या.

11 टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणार्‍या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. द्रविडने 11 कसोटींमध्ये 30 च्या सरासरीने आतापर्यंत 624 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. भारताने आफ्रिकेत पहिलीवहिली कसोटी द्रविडच्या मार्गदर्शनाखालीच जिंकली होती.

15 महान फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने आफ्रिकेत 15 कसोटी सामने खेळले असून, त्यात 46 च्या सरासरीने 1 हजार 161 धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

2-1 भारतीय संघाने जर तिसरी कसोटी जिंकली तर भारत 2-1 ने मालिका विजय मिळवेल. टीम इंडियाची ती ऐतिहासिक कामगिरी ठरेल. भारताने आतापर्यंत आफ्रिकेत 2010-11 साली कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती. तिच भारताची आफ्रिकेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

Back to top button