AUS vs ENG 4th Test : शेपटाने इंग्लंडला वाचवले | पुढारी

AUS vs ENG 4th Test : शेपटाने इंग्लंडला वाचवले

सिडनी ; वृत्तसंस्था : तळाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चिकाटीने सामना केल्यामुळे पाहुण्या इंग्लंड संघाला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर चौथा कसोटी सामना ((AUS vs ENG 4th Test)) ड्रॉ करण्यात यश मिळाले. जॅक लीच (34 चेंडू), स्टुअर्ट ब्रॉड (35 चेंडू) आणि जेम्स अँडरसन (6 चेंडू) यांनी शेवटच्या 10 षटकांत किल्ला लढवित इंग्लंडचा पराभव टाळला. स्कॉट बोलंड (30 धावांत 3 विकेटस्), कर्णधार पॅट कमिन्स (80 धावांत दोन विकेटस्) आणि नॅथन लियॉन (28 धावांत दोन विकेटस्) यांनी ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळ नेले.

स्टिव्ह स्मिथने (10 धावांत एक विकेट) दोन षटके शिल्लक असताना लीचला बाद केले; पण शेवटच्या षटकात यजमानांना एक विकेट मिळवता आली नाही. ब्रॉड आणि अँडरसन यांनी दोन षटके टिकून फलंदाजी केली व इंग्लंडला पराभवापासून वाचवले. इंग्लंड संघाने 102 षटकांत 9 बाद 270 धावा केल्या. संघ 388 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता.

इंग्लंडच्या फलंदाजांनी मालिकेतील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्यामुळे सामना ड्रॉकडे जाताना दिसत होता. मात्र, शेवटच्या तासात कमिन्सने जोस बटलर (11) आणि मार्क वूड (शून्य) यांना बाद करीत सामन्यात चुरस निर्माण केली. यावेळी संघाची धावसंख्या ही 7 बाद 218 अशी होती. कसोटी क्रिकेटची चांगली सुरुवात करणार्‍या बोलंडने जॉनी बेअरस्टोला (41) बाद केले. ब्रॉड आणि लीचने यानंतर आठहून अधिक षटके ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना केला.

प्रकाश कमी झाल्याने शेवटची तीन षटके लियॉन आणि स्मिथ यांना करावी लागली. स्मिथने लीचला बाद करीत सामन्यात चुरस आणली; पण शेवटची विकेट मिळवण्यास यजमानांना अपयश आले. यापूर्वी स्टोक्सने 123 चेंडूंत 10 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 60 धावांची खेळी केली. त्याने पहिल्या डावात देखील 66 धावा केल्या
होत्या.

इंग्लंडच्या संघाने बिनबाद 30 धावसंख्येपुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, सलामीवीर हसीब हमीद (9) आणि डेव्हिड मलान (4) यांना जास्त काही करता आले नाही. सलामी फलंदाज जॅक क्राऊलीने आक्रमक खेळ केला. त्याने 8 चौकारांच्या मदतीने 69 चेंडूंत अर्धशतक झळकावले; पण 77 धावा करून तो माघारी परतला. त्याला कॅमेरुन ग्रीनने बाद केले. ज्यो रूट (24) आणि स्टोक्सने 26 षटकांत 60 धावांची भागीदारी केली. मात्र, चहापानापूर्वी बोलंडने रूटला बाद करीत ही भागीदारी मोडीत काढली.

संक्षिप्‍त धावफलक (AUS vs ENG 4th Test)

ऑस्ट्रेलिया प. डाव : 8 बाद 416 (घोषित)
इंग्लंड प. डाव : सर्वबाद 294.

ऑस्ट्रेलिया दु. डाव : 6 बाद 265 (घोषित)
इंग्लंड दु. डाव : 9 नाबाद 270. (सामना अनिर्णीत)

Back to top button