फिफा विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीमच

मिलिंद ढमढेरे

युरो चषक आणि दक्षिण अमेरिकेतील कोपा अमेरिका चषक या दोन्ही स्पर्धा म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद लुटण्यासाठी असलेली पर्वणीच असते. या स्पर्धा म्हणजे फिफा विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीमच मानली जाते. युरो चषक स्पर्धेत माजी विश्वविजेत्या इटलीने बर्‍याच कालावधीनंतर युरो चषकाचे स्वप्न साकार केले; तर रिओ डी जानेरो येथे झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाने यजमान ब्राझीलला घरच्या मैदानावर पराभूत करीत विजेतेपदाचे स्वप्न साकार केले.

कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिना आणि ब्राझील या माजी विश्वविजेत्या संघांच्या तुलनेत अन्य संघ फारसे आव्हानात्मक मानले जात नाहीत. एकेकाळी उरुग्वेने या स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला होता मात्र आता त्यांचे आव्हान फुसकेच राहिले आहे. या तुलनेमध्ये युरो चषक स्पर्धेत विश्वविजेता फ्रान्स, जर्मनी, इटली, इंग्लंड, स्पेन, स्वीडन, पोर्तुगाल आदी बलाढ्य संघांचा समावेश असल्यामुळे ही स्पर्धा चाहत्यांसाठी रोमांचकारी होती. त्यातच पुढील वर्षी फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार असल्यामुळे त्याबाबत आडाखे बांधण्यासाठी या दोन्ही स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या होत्या. व्यावसायिक लीग स्पर्धांमध्ये अब्जावधी डॉलर्सची बोली ज्या खेळाडूंबाबत लावली जाते असे. रथी-महारथी खेळाडू या दोन्ही स्पर्धांमध्ये असल्यामुळे त्यांच्या कामगिरीबाबत एक उत्सुकता होती.

युरो स्पर्धेच्या तुलनेत कोपा अमेरिका स्पर्धेचा आवाका खूप लहान होता. या स्पर्धेत विजेतेपदासाठी अर्जेंटिना आणि ब्राझील हे दोन संघच प्रबळ दावेदार आहेत हे स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच निश्चित झाले होते. कोलंबिया, पेरू, चिली या संघांकडे अनपेक्षित विजय नोंदवण्याची क्षमता असली तरी सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते त्याप्रमाणे हे संघ त्यांची एकंदर कामगिरी पाहता अंतिम फेरी गाठणे अशक्य मानले जात होते. ब्राझील संघास या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यातही उपांत्य फेरीत पेरू संघाविरुद्ध त्यांना नशिबाने विजय मिळाला. पण अंतिम सामन्याकरिता आपले मातब्बर खेळाडू शंभर टक्के तंदुरुस्त पाहिजेत, या उद्देशाने त्यांनी अगोदरच्या सामन्यांमध्ये फारसा धोका न पत्करता खेळ केला.

गाफीलपणामुळे ब्राझील पराभूत

ब्राझील संघाच्या तुलनेत अर्जेंटिनाची कामगिरी साखळी गटात चांगली झाली होती, तथापि उपांत्य फेरीत त्यांनाही कोलंबियाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा आधार घ्यायला लागला. ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना म्हणजे नेमार विरुद्ध लिओनेल मेस्सी अशीच लढत अपेक्षित होती. ब्राझील संघास घरचे मैदान आणि वातावरणाचा फायदा होता. त्यांच्या खेळाडूंनी मेस्सीकडे जास्त वेळा चेंडू जाणार नाही अशीच योजना आखली होती. तथापि मेस्सीचा सहकारी एंजल डी मारिओ हा देखील गोल करण्याबाबत खूप माहीर खेळाडू आहे हे त्यांच्या बचाव फळीतील खेळाडूंना लक्षात आले नाही आणि नेमकी हीच चूक त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. मारिओने 22 व्या मिनिटालाच गोल करीत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी बचाव तंत्रावरच जास्त भर दिला. सामन्याच्या उर्वरित वेळेत नेमार आणि त्याच्या अन्य सहकार्‍यांनी केलेली धारदार आक्रमणे अर्जेंटिनाच्या बचाव रक्षकांनी थोपविली. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलिओ मार्टिनेझ याने गोलरक्षण किती भक्कमरीत्या करायचे असते याचा प्रत्यय घडविला आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचे पारितोषिकही पटकाविले. मेस्सी हा व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रातील श्रेष्ठ खेळाडू मानला गेला असला तरीही आपल्या देशास त्याने मिळवून दिलेले हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलेच मोठे विजेतेपद आहे. अंतिम सामन्यानंतर नेमार याने मेस्सी याला आलिंगन देत खिलाडू वृत्तीचे उत्तम दर्शन दिले. मेस्सी आणि कोलंबियाचा लुईस दियाज यांनी प्रत्येकी चार गोल नोंदवीत स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळविला.

कोलंबियाने पेरू संघावर पूर्ण वेळेत 3-2 अशी मात करीत तिसर्‍या क्रमांकाचे बक्षीस मिळविले. त्यांच्यासाठी ही समाधानकारक गोष्ट असली तरीही पुढील वर्षी होणार्‍या विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांना बरीच तयारी करावी लागणार आहे. एकेकाळी फुटबॉलमध्ये मक्तेदारी गाजविणार्‍या उरुग्वे, पॅराग्वे, चिली या संघांनाही विश्वचषकासाठी आत्तापासूनच खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत.

सांघिक कौशल्य हेच यशाचे गमक

युरो चषक स्पर्धेत विजेतेपदासाठी इटलीचे पारडे जड मानले जात होते आणि पहिल्या सामन्यापासूनच त्यांच्या खेळात सातत्य दिसून आले. खेळाडूंमधील समन्वय, पासेस देण्याची शैली, भक्कम बचाव आणि गोल करण्यासाठी आवश्यक असणारी अचूकता याबाबत त्यांच्या खेळाडूंनी संघ व्यवस्थापनाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरविला. उपांत्य फेरीत स्पेनविरुद्ध अंतिम फेरीत यजमान इंग्लंडविरुद्ध त्यांनी पेनल्टी शूटआऊटद्वारा विजय मिळविला. पेनल्टी शूटआऊट म्हणजे नशिबाचाच एक भाग असतो असे म्हटले जात असले तरीही पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल करणार्‍यांचे अचूक कौशल्य आणि गोलरक्षकाची गोल अडवण्यासाठी असणारे चापल्य या दोन्हींची कसोटी असते. इटलीचा गोलरक्षक गियानलुकी दोनारुमा याने या स्पर्धेत गोलरक्षणाची सुरेख कामगिरी केली. त्याचे सहकारी डोमिनिको बेरार्दी, लिओनार्दो बोनुकी, फेडरिको बनादेशी यांनी पेनल्टी शूटआऊटबाबत दाखवलेले कौशल्य अतुलनीय होते. अंतिम फेरीत इंग्लंडचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट यांनी पेनल्टी शूटआऊटच्या वेळी तीन युवा खेळाडूंना संधी देण्याचा धोका पत्करला. मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलटी आला. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण सामन्यात फारसा भाग घेतला नव्हता. साहजिकच अंतिम सामन्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास त्यांच्यात नव्हता आणि परिणामी त्यांनी गोल करण्याच्या संधी वाया घालवल्या.

समन्वयाचा अभाव आणि मानसिक दडपण

फुटबॉलसारख्या खेळात सांघिक कौशल्य हीच यशाची गुरुकिल्ली मांडली जाते. उपांत्य फेरीत नैपुण्यवान खेळाडू असूनही डेन्मार्कच्या खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या संघास स्थानिक वातावरण आणि प्रेक्षकांचा पाठिंबा असल्याचे दडपणही त्यांनी घेतले. त्यामुळेच गुणवत्ता असूनही ते अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत. विश्वचषकावर अनेक वेळा नाव कोरणार्‍या जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन या संघांच्या खेळाडूंमध्येही अपेक्षित असे सांघिक कौशल्य दिसले नाही. फाजील आत्मविश्वासामुळेही त्यांना अनेक वेळेला खेळावर नियंत्रण मिळविता आले नाही. तसेच गोल करण्याच्या अनेक संधी त्यांच्या खेळाडूंनी अचूकतेच्या अभावी गमावल्या. स्वयंगोलसारखी चूक जर्मनीच्या संघाकडून अपेक्षित नव्हती. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सोमेर याने या स्पर्धेत किमान 50 हून अधिक गोल वाचवले असतील. पण त्याच्या अन्य सहकार्‍यांनी केलेल्या चुकांमुळेच त्याच्या संघास उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.

फुटबॉल खेळाडूंसाठी फिफा विश्वचषक स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. पुढील वर्षी होणार्‍या या स्पर्धेचे आत्तापासूनच पडघम सुरू झाले आहेत. युरो चषक आणि कोपा अमेरिका चषक स्पर्धांमध्ये ज्या देशांना अपेक्षेइतके यश मिळाले नाही, त्यांना जागतिक स्तरावर पुन्हा गौरवास्पद स्थान मिळवण्यासाठी विश्वचषक स्पर्धा ही सोनेरी संधी असणार आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच नियोजनपूर्वक सराव केला पाहिजे.

इंग्लंडच्या चाहत्यांची अखिलाडू वृत्ती!

इंग्लंडच्या चाहत्यांच्या अखिलाडूपणाचे युरो स्पर्धेत अनेक वेळा दर्शन घडले. जर्मनी, डेन्मार्कविरुद्धच्या सामन्याचे वेळी प्रतिस्पर्धी देशाचे राष्ट्रगीत वाजत असताना इंग्लंडच्या प्रेक्षकांनी आरडाओरड करीत निंदनीय कृत्य केले. डेन्मार्कविरुद्धच्या सामन्यात अलाहिदा डावात इंग्लंडला पेनल्टीची संधी मिळाली. त्यावेळी इंग्लंडच्या काही चाहत्यांनी लेसर किरणाच्या सहाय्याने डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर मिश्चेल याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल इंग्लंडला दंड करण्यात आला. मात्र हे गैरकृत्य इंग्लंडकडून झाल्यानंतरही पेनल्टी किक पुन्हा घेण्याची डेन्मार्कची मागणी मान्य केली गेली नाही. ही मागणी मान्य झाली असती तर ते अधिक उचित ठरले असते. अंतिम सामन्यात इटलीकडून पराभूत झाल्यानंतर व वेम्बले स्टेडियम परिसरात इंग्लंडच्या पाठीराख्यांनी इटलीच्या अनेक चाहत्यांची मारहाण केली.

कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

एकीकडे कोरोनाच्या महामारीमुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करायची. पण त्याच वेळी युरो चषक सामन्यांना प्रेक्षकांना मोकळेपणाने प्रवेश द्यायचा, असे दुटप्पी धोरण इंग्लंडकडून दिसून आले. बहुसंख्य प्रेक्षकांनी मास्क परिधान केला नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळला नव्हता. ब्राझीलमधील कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅराकाना स्टेडियमची क्षमता 78 हजार असतानाही फक्त 7, 800 प्रेक्षकांनाच प्रवेश देण्यात आला होता आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळूनच त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. खरं तर ब्राझीलचा संघ अंतिम फेरीत असताना या स्टेडियमवर सर्वांनाच प्रवेश देण्याची हुकमी संधी संयोजकांना मिळाली होती. मात्र त्यांनी कोरोनाचे नियम व्यवस्थितपणे पाळले. इंग्लंडमध्ये मात्र विरोधाभास पाहावयास मिळाला. उपांत्य आणि अंतिम फेरीच्या लढतीचे वेळी वेंबले स्टेडियम खचाखच भरले होते.

वर्णद्वेषाच्या टिप्पणीमुळे गालबोट

इंग्लंडच्या संघात मार्कोस रॅशफोर्ड, जेडन सँचो व बुकायो साका या तीन कृष्णवर्णीय खेळाडूंचा समावेश होता. या तीनही खेळाडूंनी अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटचे वेळी गोल करण्याच्या संधी दवडली. त्यामुळे इंग्लंडच्या असंख्य चाहत्यांनी ऑनलाईनद्वारे या तीनही खेळाडूंबाबत वर्णद्वेषी टिप्पणी केल्यामुळे या स्पर्धेस गालबोट लागले आहे. आफ्रिका आणि अन्य खंडांमधील अनेक कृष्णवर्णीय खेळाडू फुटबॉल आणि अन्य अनेक खेळांमध्ये युरोपियन तसेच आशियाई देशांकडून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. इंग्लंडच्या चाहत्यांनी केलेल्या अयोग्य टिप्पणीमुळे या खेळाडूंच्या चांगल्या प्रतिमेस तडा गेला आहे.

Back to top button