पुढारी ऑनलाईन डेस्क : सेंच्युरियन कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला आहे. विराट सेनेने यजमान द. आफ्रिका संघाला ११३ धावांनी पराभूत करून दणदणीत विजय मिळवला. सेंच्युरियन येथे कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई संघ म्हणून टीम इंडियाची नोंद झाली आहे. (Mohammed Siraj)
उपाहारापर्यंत भारताने यजमान संघाचे सात गडी बाद केले होते आणि दुसऱ्या सत्रात अवघ्या दोन षटकांत तीन विकेट्स घेवून भारताने सामना जिंकला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात अर्धशतक फटकावणा-या टेंबा बावुमाकडून दुस-या डावातही चांगला खेळ करण्याच्या आशा होत्या. झालेही तसेच. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला पण दुसऱ्या टोकाला फलंदाज बाद होत राहिले अन् यजमान द. आफ्रिकेला पराभव स्विकारावा लागला. (Mohammed Siraj)
दक्षिण आफ्रिकेसाठी टेम्बा बावुमाने एक बाजू धरून ठेवलीहोती. जर दक्षिण आफ्रिकेला हा सामना वाचवायचा असेल, तर बावुमाने क्रीजवर टिकून राहणे अत्यंत गरजेचे होते. तो सुद्धा तीच भूमिका संयमीपणे पार पाडत होता. बावुमा क्रीझवर भारतीय गोलंदाजांचा मोठ्या जोमाने सामना करताना दिसला. दरम्यान, सेंच्युरियन कसोटीच्या पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी आपल्या सर्वोत्तम गोलंदाजीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
त्यातच आपल्या आक्रमकतेमुळे प्रसिद्ध असलेला मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतदरम्यान चर्चेचा विषय राहिला. सामन्यादरम्यान सिराजने फेकलेला चेंडू फलंदाज टेंबा बावुमाच्या पायावर आदळला. चेंडू इतक्या जोरात पायाला लागला की फिजिओला मैदानावरच बोलावावे लागले.
टेंबा बावुमाने मोहम्मद सिराजचा (Mohammed Siraj) एक चेंडू सरळ बॅटने खेळला. त्यानंतर चेंडू थेट सिराजच्या हातात गेला. त्याचवेळी फॉलोथ्रोमध्ये असलेया सिराजने आपल्या दिशेने येत असलेला चेंडू पकडला आणि क्रिजमधेच असलेल्या बावुमाच्या दिशेने वेगाने फेकला. हा थ्रो थेट बावुमाच्या घोट्याला लागला. त्यानंतर फिजिओला मैदानात बोलावण्यात आले. १० मिनिटे खेळही थांबवण्यात आला. या प्रकारानंतर सिराजने बावुमाची माफीही मागितली. पण समालोचन करणाऱ्या सुनील गावस्कर आणि माईक हेझमन यांनी सिराजच्या या चूकीचा थ्रो करण्याच्या पद्धतीवर आखेप घेत नाराजी व्यक्त केली.
सुनील गावस्कर यांनीही सिराजच्या या वागण्यावर टीका करत, असा थ्रो करण्याची त्यावेळी गरज नसल्याचे सांगितले. मात्र, सिराजने बावुमाची माफी मागणे ही खिलाडूवृत्ती असल्याचे म्हणत त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद सिराजच्या या वागण्यावर सामनाधिकारी काही कारवाई करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून आले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पाचव्या दिवशी क्विंटन डी कॉकची विकेट घेत विजयाचा मार्ग मोकळा केला होता.