Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची बॅट पुन्हा तळपली, विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग ३ शतके झळकावले | पुढारी

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची बॅट पुन्हा तळपली, विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग ३ शतके झळकावले

पुढारी ऑनलाईन डेस्क : एमएस धोनीची (MS Dhoni) टीम सीएसकेकडून (CSK) आयपीएल खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) बॅट देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चांगलीच तळपली आहे. ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ (Vijay Hazare Trophy)मध्ये सलग तिसरे शतक झळकावले आहे. आज (दि. ११) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना त्याने केरळविरुद्ध १२४ धावा करत शानदार शतक झळकावले. गायकवाडने १२९ चेंडूत १२४ धावांची खेळी खेळली, ज्यात ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. गायकवाडने ११० चेंडूत शतक पूर्ण केले.

महाराष्ट्राने २९१ धावा केल्या…

या सामन्यात महाराष्ट्राने ८ गड्यांच्या मोबदल्यात २९१ धावा केल्या आहेत. गायकवाडशिवाय (Ruturaj Gaikwad) राहुल त्रिपाठीने ९९ धावा केल्या. त्याने १०८ चेंडूंचा सामना केला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार मारले. गायकवाडने लिस्ट ‘ए’मध्ये ६१ सामन्यांमध्ये ५२.१२ च्या सरासरीने २९७१ धावा केल्या आहेत. त्याने ९ शतके आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद १८७ ही त्याची सर्वात मोठी वैयक्तीक धावसंख्या आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ९९ राहिला आहे, जो खूप चांगला मानला जाऊ शकतो.

ऋतुराजची विकेट पडेपर्यंत महाराष्ट्राने ४५ षटकांत २४९ धावा केल्या होत्या आणि महाराष्ट्राने ५ विकेट गमावल्या होत्या. पहिल्या सामन्यात ऋतुराजने १३६ धावा करून मध्य प्रदेश विरुद्ध ३३० धावांचे मोठे लक्ष्य पार केले होते. केरळविरुद्ध महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. पहिल्या ५ षटकांत २ गडी बाद झाल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठीने ३४ षटकांत १९५ धावांची मोठी भागीदारी रचली. राहुल त्रिपाठीला शतक पूर्ण करण्यासाठी १ धाव कमी पडली. तो ९९ धावा करून बाद झाला. महाराष्ट्राने ८ गड्यांच्या मोबदल्यात २९१ धावा केल्या. ऋतुराज आणि राहुल यांच्या मोठ्या खेळीमुळे महाराष्ट्राने केरळला २९२ धावांचे लक्ष्य दिले.

सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी या स्पर्धेतील ऋतुराजचे हे तिसरे शतक आहे. यापूर्वी गायकवाडने (Ruturaj Gaikwad) छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात १४३ चेंडूत १५४ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याचवेळी मध्य प्रदेशविरुद्ध त्याने १३६ धावांची खेळी करत स्पर्धेतील दुसरे शतक ठोकले. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये गायकवाडने शतक झळकावून भारतीय वरिष्ठ संघातील एन्ट्रीसाठी दार ठोठावले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत ऋतुराजचा (Ruturaj Gaikwad) संघात समावेश करण्यात आला होता. पण तो एकही सामना खेळू शकला नाही. मात्र, आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराजने ज्याप्रकारे जबरदस्त फॉर्म दाखवला आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला पुन्हा टीम इंडियाकडून बोलावले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गायकवाड हा IPL चा सर्वात तरुण ऑरेंज कॅप विजेता…

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आयपीएलच्या गेल्या मोसमात १६ सामन्यात ६३५ धावा केल्या. तो लीगचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याने ऑरेंज कॅप जिंकली. २४ वर्षीय गायकवाड हा या स्पर्धेतील सर्वात तरुण ऑरेंज कॅप विजेता ठरला. या स्पर्धेदरम्यान त्याने एक शतक आणि ४ अर्धशतक झळकावले. सीएसकेला चॅम्पियन बनवण्यात ऋतुराजचा मोलाचा वाटा होता. २०२१ च्या मोसमात त्याने २३ षटकार आणि ६४ चौकार ठोकले.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव…

ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. गायकवाडच्या फलंदाजीची सर्वत्र चर्चा आहे. चाहते ट्विट करून त्याच्या फलंदाजीवर प्रतिक्रिया देत आहेत आणि बीसीसीआयलाही त्याला संघात समाविष्ट करण्याचा सल्ला देत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली. आता गायकवाडने सलग तीन शतके झळकावल्यानंतर भारतीय एकदिवसीय संघातही तो आपले स्थान निश्चित करेल अशी अपेक्षा आहे.

Back to top button