आर. अश्विनची अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप | पुढारी

आर. अश्विनची अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप

पुढारी ऑनलाईन डेस्क 

न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फायदा झाला आहे.  अश्विनने अष्टपैलूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या क्रमवारीत मयंक अग्रवाल ११ व्या स्थानावर तर शुभमन गिल ४६ व्या स्थानावर पोहोचला आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पाचव्या आणि भारतीय कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानावर कायम आहे.

न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत अश्विनला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता. त्याने दोन सामन्यात १४ विकेट घेतल्या होत्या. तसेच फलंदाजीत देखील योगदान दिले होते. याचा फायदा त्याला कसोटीतील क्रमवारीत झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी कसोटीतील ताजी क्रमवारी जाहीर केली. आयसीसीच्या या क्रमवारीत गोलंदाजीत आणि ऑल राउंडर श्रेणीत अश्विनने डबल धमाका केला. या दोन्ही यादीत रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. कसोटी ऑल राउंडरमध्ये अश्विन ३६० गुणांसह दुसऱ्या स्थानावर तर गोलंदाजीत ८३३ गुणांसह तो दुसऱ्या स्थानावर आहे.

केवळ कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स त्याच्या पुढे आहे. पॅट कमिन्स ९०८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑल राउंडरमध्ये वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर ३८२ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. क्रिकेटमधून काही काळ लांब राहण्यारा बेन स्टोक्स तिसऱ्या स्थानावर आहे. आजपासून सुरू झालेल्या अॅशेस मालिकेत तो पुन्हा मैदानावर परतला आहे.

आयसीसीच्या क्रमवारीत अश्विनला फायदा झाला असला तरी भारताचा दुसरा ऑल राउंडर रविंद्र जडेजाचे नुकसान झाले आहे. जडेजा ३४६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. जडेजाने दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळता आले नाही. या क्रमवारीमध्ये भारताविरूध्द मुंबई कसोटीत १० विकेट घेणारा न्यूझीलंडच्या एजाज पटेलने क्रमवारीत ३८वे स्थान मिळवले आहे.

रोहित आणि कोहली यांचाही टॉप टेन मध्ये कायम

फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पाचव्या आणि भारतीय कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंड विरूध्दच्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळला नाही तर विराटने फक्त दुसऱ्या सामन्यात खेळला. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटला विशेष काही करता आले नाही.

मयंक ११ व्या तर गिल ४६ व्या स्थानावर 

आयसीसीच्या कसोटच्या या क्रमवारीत चांगली फलंदाजी करणाऱ्या मयंकला देखील फायदा झाला. त्याने क्रमवारीत ३१ स्थानांची झेप घेत ११ व्या स्थानावर पोहचला आहे. तर शुभमन गिलने २२ स्थानांची प्रगती केली असून तो ४६ व्या स्थानावर पोहचला आहे. आयसीसी क्रमवारीत रहाणे आणि पुजारा यांना फटका बसला आहे.

Back to top button