INDvsNZ Mumbai Test : भारताला विजयासाठी ५ विकेट्सची गरज | पुढारी

INDvsNZ Mumbai Test : भारताला विजयासाठी ५ विकेट्सची गरज

मुंबई, पुढारी ऑनलाईन : India vs New Zealand Mumbai Test 3rd day :टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर ५४० धावांचे लक्ष्य ठेवले असून, त्याचा पाठलाग करताना किवी संघाची धावसंख्या तिसऱ्या दिवसअखेर ५ गडी गमावून १४० झाली आहे. हेन्री निकोल्स नाबाद ३६ आणि रचिन रवींद्रने २ धावा केल्या. आर अश्विनने भारताकडून आतापर्यंत ३ आणि अक्षर पटेलने १ बळी घेतला आहे. सामन्याला अजून दोन दिवस बाकी आहेत. भारतीय संघ विजयापासून ५ विकेट्स दूर आहे. तर न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी आणखी ४०० धावा करायच्या आहेत.

न्यूझीलंडला पावचा झटका… टॉम ब्लंडेल धावबाद

टॉम लॅथम, विल यंग आणि रॉस टेलर यांच्या रूपाने न्यूझीलंडची टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडली आहे. अश्विनने आपली अप्रतिम फिरकी दाखवली. तिन्ही खेळाडूंना आपल्या जाळ्यात अडकवले आणि तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर डॅरिल मिशेल आणि हेन्री निकोल्सने यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी (१११ चेंडूत ७३) भागिदारी केली. मिशेलने ही आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर ही जोडी अक्षर पटेलने फोडली. त्याने ६० धावांवर खेळत असलेल्या मिशेलला जयंत यादव करवी झेलबाद केले. या धक्क्यातून किवी संघ सावरत असतानाच आणखी एक धक्का बसला. यष्टीरक्षक टॉम ब्लंडेल (०) धावबाद झाला. ब्लंडलने मिड ऑफच्या दिशेने चेंडू फटकावला. त्यानंतर तो धाव घेण्यासाठी सरसावला. मात्र, दुसऱ्या टोकाकडून हेन्री निकोल्सने त्याला धाव घेण्यास नकार दिला. याच वेळी केएस भरतने किवी खेळाडूंमधील समन्वयाच्या अभावाचा फायदा घेतला आणि चेंडू उचलून पटकन विकेटकिपर साहाकडे फेकला. अशाप्रकारे न्यूझीलंडने त्यांची ५ वी विकेट गमावली.


किवी संघाची पहिली विकेट १३ धावांवर पडली. आर अश्विनने ४ थ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताला यश मिळवून दिले. त्याने टॉम लॅथमला ६ धावांवर एलबीडब्लू बाद केले. यानंतर टी ब्रेक झाला. अश्विनने लॅथमला कसोटी क्रिकेटमध्ये ८ व्यांदा बाद केले. लॅथमने रिव्ह्यू घेतला, पण तिस-या पंचांचा निर्णय टीम इंडियाच्या बाजूने राहिला. डॅरिल मिशेल आणि विल यंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावा जोडून संघाचा डाव पुन्हा रुळावर आणला, मात्र अश्विनने यंगला (२०) बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. यंगच्या विकेटसह, आर अश्विन यावर्षी ५० कसोटी बळी घेणारा पहिला गोलंदाज बनला. त्यानंतर अवघ्या १० धावांच्या अंतराने अश्विनने रॉस टेलरला (६) पुजारा करवी झेलबाद केले. अश्विनची ही वैयक्तीक तिसरी विकेट आहे.


तत्पूर्वी, आज खेळाच्या तिस-या दिवशी पुजारा आणि मयंकने शानदार फलंदाजी करत भारताच्या डावाची सुरुवात केली. पण, किवी संघाच्या एजाज पटेलने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत मयंक (६२ धावा) आणि पुजारा (४७ धावा)ची विकेट घेतली आणि भारताला दोन झटके दिले. त्यानंतर शुबमन गिलने विराट कोहलीच्या साथीने अर्धशतकी (८२ धावा) भागिदारी करत संघाचा डाव सावरला. रचिन रविंद्रने गिल (४७)ची विकेट घेत ती जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला १४ धावांवर एजाजने बाद केले. त्यानंतर अवघ्या सहा धावांच्या अंतराने विराट कोहली (३६) बाद झाला. त्याचा अडसर रचिन रविंद्रने दूर केला.

टीम इंडियाला सहावा झटका रिद्धीमान साहाच्या रुपात बसला. त्याला रचिन रविंद्रने बाद केले. त्यानंतर अक्षर पटेलने जयंत यादवच्या साठीने संघाची धासंख्या झटपट वाढवण्याचा प्रयत्न केला. अक्षरने ४ षटकार ३ चौकार ठोकत २६ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या. जयंतनेही १ षटकार ठोकून सामन्यात रंजकता आणली. पण एजाजने जयंतला बादकरून भारताला सातवा झटका दिला. यावेळी भारताची धासंख्या २७६ होती. पहिल्या डावात सर्व १० बळी घेत इतिहास रचणाऱ्या एजाज पटेलने दुसऱ्या डावातही ४ बळी घेतले. रवींद्रनेही ३ विकेट्स घेतल्या.

  • वानखेडे मैदानावरील कसोटी सामन्यात एजाज पटेलने २२५ धावांच्या मोबदल्यात १४ विकेट्स मिळवल्या. या मैदानावरील कोणत्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
  • रचिन रवींद्रला शुभमन गिलच्या रूपाने पहिला कसोटी बळी मिळाला.
  • टॉम ब्लंडलने श्रेयस अय्यरला यष्टिचित केले. त्याचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच स्टंपिंग ठरले.
  • पुजाराने मागील 42 डावांमध्ये एकही शतक झळकावलेले नाही.

रचिन रविंद्रचा ट्रीपल धमाका….

रिद्धीमान साहाला बाद करून रचिनने वैयक्तीक तिसरी विकेट घेतली. ६६.२ व्या षटकात त्याने हा कारनामा केला.

विराट कोहलीची पुन्हा निराशा…

वानखेडे कसोटीत विराट कोहली दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, मात्र तो पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात ३६ धावांवर बाद झाला. त्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांची निराशा केली आहे. विराटला ३६ धावांवर रचिन रविंद्रने क्लिन बोल्ड केले. रचिनचीही या सामन्यातील वैयक्तीक दुसरी विकेट आहे. विराटने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावले होते.

एजाजचा पुन्हा धमाका…

एजाज पटेलच्या फिरकीची पुन्हा एकदा जादू पहायला मिळाली. त्याने ६१.२ व्या षटकात श्रेयस अय्यरला आपल्या जाळ्यात अडकवत यष्टीचित केले. श्रेयसने १४ धावा केल्या.

रचिन रविंद्रला पहिली विकेट…

रचिन रविंद्रने न्यूझीलंडला तिसरे यश मिळवून दिले. त्याने शुबमन गिलला बाद केले. लॅथमने त्याचा झेल पकडला. गिलने चार चौकार, एक षटकाराच्या सहाय्याने ७५ चेंडूत ४७ धावा केल्या.

लंच ब्रेक…

दरम्यान, ४६ व्या षटकानंतर लंच ब्रेक झाला. यावेळी क्रिजवर विराट कोहली, आणि शुबमन गिल होते आणि टीम इंडियाची धावसंख्या दुसऱ्या डावात ४६ षटकात दोन बाद १४२ होती. तर संघाची एकूण आघाडी ४०५ धावांवर पोहचलेली.

भारताला दुसरा झटका…. पुजारा बाद…

३४.४ व्या षटकात एजाज पटेलने पुजारा पुन्हा फसवले. ऑफसाईडला वळण घेत असलेला चेंडू पुजाराच्या बॅटला स्पर्श करून स्लिपच्या दिशेने गेला. त्याठिकाणी उभा असणा-या रॉस टेलरने झेल पकडला. पण हा चेंडू जमीनीला स्पर्श करून टेलच्या हातात गेल्याचा संशय पुजारा आला. त्यामुळे त्याने रिव्ह्यू घेतला. पण रिप्लेमध्ये झेल योग्य पद्धतीने पकडल्याचे दिसले. त्यामुळे पुजाराला पॅव्हेलियनचा रस्ता पकडावा लागला. त्याचे अर्धशतक ३ धावांनी हुकले. ९७ चेंडूत ४७ धावा करून पुजाराला माघारी परतावे लागले.

DRS ने पुजाराला वाचवले..

एजाज पटेलच्या ३४ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेतेश्वर पुजारा LBW आऊट झाला. पण पुजाराने डीआरएस घेतला आणि रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू विकेटच्या वरून जात आहे. त्यामुळे पुजारा नाबाद राहिला.

भारताला पहिला झटका… मयंक अग्रवाल बाद

शतकी भागिदारी करणा-या मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराची जोडी फोडण्यात न्यूझीलंडला यश आले. एजाज पटेलने ३१.२ व्या षटकात भारताला पहिला झटका दिला. त्याने मयंकची विकेट घेतली. मयंकने १०८ चेंडूत १ षटकार ९ चौकाराच्या सहाय्याने ६२ धावा केल्या. पुजारासह त्याने पहिल्या विकेटसाठी १८८ चेंडूत १०७ धावांची भागिदारी केली.

  • वानखेडेवर कसोटीच्या दोन्ही डावात ५०+ धावा करणारा मयंक हा भारताचा चौथा सलामीवीर ठरला.
  • मयंक अग्रवालने कसोटीच्या दोन्ही डावात ५०+ धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मयंकचे अर्धशतक..

एजाज पटेल २६ वे षटक टाकत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर मयंक अग्रवालने एक उत्तुंग षटकार ठोकत आपले अर्धशतक (८९ चेंडूत ५२ धावा) पूर्ण केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्याने चौकार लगावला आणि एजाजच्या फिरकीचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्या डावात १५० धावा आणि त्यानंतर दुस-या डावात अर्धशतक पूर्ण करणा-या मयंकने वानखेडेवर आपल्या खेळाने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

DRS ने मयंकला वाचवले….

टीम साऊदी २४ षटक टाकत होता. त्याने तिसऱ्या चेंडूवर मयंक अग्रवालविरुद्ध एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील केले. त्यानंतर मैदानी पंचांनी मयंक बाद असल्याचा निर्णय दिला. पण आपण बाद नसण्यावर मयंक ठाम होता त्याने तत्काळ रिव्ह्यू घेतला. त्यानंतर रिप्लेमध्ये चेंडूचा स्पर्श मयंकच्या बॅटला झाल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे तिस-या पंचांनी मयंक नाबाद असल्याचा निर्णय दिला.

मुंबई कसोटीचा दुसरा दिवस रोमांचकारी..

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता ६९ धावा केल्या होत्या. मयंक अग्रवाल (३८) आणि पुजारा (२९) क्रीजवर होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची आघाडी ३३२ धावांवर गेली. भारताच्या ३२५ धावांसमोर न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ ६२ धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर भारताने २६३ धावांची आघाडी घेतली.
एजाजची धमाल कामगिरी…

मुंबई कसोटी सामन्याचा संपूर्ण दिवस न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलच्या नावावर होता. भारताच्या पहिल्या डावात मयंकने १५० धावा केल्या असल्या तरी फिरकीपटू एजाजचा पराक्रम क्रिकेटच्या इतिहासात दुर्मिळ आहे. एजाजने भारताच्या पहिल्या डावात सर्व १० विकेट घेत इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात १० बळी घेणारा एजाज जगातील तिसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी असा अनोखा पराक्रम जिम लेकर (इंग्लंड) आणि अनिल कुंबळे (भारत) यांनी केला आहे.

Back to top button