पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या हायप्रोफाईल प्रकरणात मुंबई पोलिसांनी हार्दिक आणि कृणाल यांचा सावत्र भाऊ वैभव पंड्या (वय 37) याला अटक केली आहे.
हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हे दोघेही सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 खेळण्यात व्यस्त आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनी त्यांचा सावत्र भाऊ वैभव पंड्या याच्याविरुद्ध 4.3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने संशयीत आरोपी वैभव पंड्याला 8 एप्रिल रोजी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत.'
2021 मध्ये हार्दिक, कृणाल आणि वैभव या तिघांनी भागीदारीत पॉलिमरचा व्यवसाय सुरू केला होता. यामध्ये हार्दिक आणि कृणाल हे दोघे प्रत्येकी 40 टक्के गुंतवणूक करतील, तर सावत्र भाऊ वैभव 20 टक्के गुंतवणूक करेल आणि दैनंदिन कामकाज हाताळेल अशा अटी होत्या. नफा त्याच प्रमाणात वाटला जाणार होता. मात्र, वैभवने भागीदारी कराराचा भंग केला आणि हार्दिक-कृणालला न कळवता त्याच व्यवसायात दुसरी कंपनी स्थापन केली.
तसेच त्याने गुप्तपणे त्याचा नफा 20% वरून 33.3% पर्यंत वाढवून घेतला. यामुळे मूळ भागीदारीचा नफा कमी झाला, ज्यामुळे हार्दिक आणि कृणाल पंड्याला 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले. एवढेच नाही तर सावत्र भावाने भागीदारी फर्मच्या खात्यातून एक कोटी रुपये काढून स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. या सर्व प्रकाराची माहिती मिळताच हार्दिक आणि कृणाल यांनी वैभवला जाब विचारला. त्यावर वैभवने हार्दिक आणि कृणाल यांची प्रतिष्ठा खराब करण्याची धमकी दिली, असेही आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत.