पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG 4th Test : राजकोट येथील तिसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडविरुद्ध ४३४ धावांनी शानदार विजय मिळवत ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिल्या हैदराबाद कसोटीत पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन केले आणि सलग दोन सामन्यात इंग्लिश संघाला पाणी पाजले. या विजयी वाटचालीत संघाच्या खेळाडूंनी बॅट आणि बॉलने चमकदार कामगिरी नोंदवली.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आतापर्यंतच्या तिन्ही कसोटी सामन्यांत इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. मालिकेत सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. मात्र, चौथ्या कसोटीत तो खेळणार नसल्याची चर्चा आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याला रांची कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या आधी मोहम्मद सिराजला विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्याचप्रमाणे बुमराह पुढील सामन्यात बेंचवर बसलेला दिसेल असे काहींचे म्हणणे आहे. (IND vs ENG 4th Test)
30 वर्षीय बुमराहने विशाखापट्टणम कसोटीत 9 विकेट घेत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो सामना भारताने 106 धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली होती. मालिकेतील तीन सामने खेळले गेले आहेत. दोन अजून बाकी आहेत. दरम्यान, बुमराहने मालिकेत 80.5 षटके टाकली असून 13.65 च्या सरासरीने 17 बळी घेतले आहेत. मार, त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. रांचीची खेळपट्टी लक्षात घेता तिथे फिरकीपटू वर्चस्व आहे. त्यामुळे अशा स्थितीत बुमराहच्या जागी दुसरा वेगवान गोलंदाज खेळवला जाईल की संघ एका वेगवान गोलंदाजासह अतिरिक्त फिरकीपटूसह मैदानात उतरेल याची उत्सुकता लागली आहे. (IND vs ENG 4th Test)
मोहम्मद सिराजच्या जागी मुकेश कुमारला विशाखापट्टणम कसोटीत संधी मिळाली. त्याने सामन्यात 70 धावांत 1 बळी घेतला. यानंतर त्याला रणजी ट्रॉफीतील सामन्यासाठी भारतीय संघातून मुक्त करण्यात आले. त्यानंतर कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर मुकेशने बंगालकडून खेळताना बिहार संघाचे कंबरडे मोडले. त्याने एका डावात 32 धावा देत सहा विकेट घेतल्या. तर एकूण सामन्यात त्याने 50 धावांत 10 बळी मिळवले. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. जर भारताने बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज घेण्याचे ठरवले तर मुकेशचे नाव आघाडीवर असेल.
दुसऱ्या कसोटीनंतर आकाश दीपला संघात संधी मिळाली. रांची कसोटीसाठी तो सिराजसोबत सीम बॉलिंगचा पर्यायही असू शकतो. बंगालचा हा 27 वर्षीय वेगवान गोलंदाज अलीकडेच अहमदाबाद येथे भारत अ संघाकडून खेळला. त्याने इंग्लंड लायन्स संघाविरुद्धच्या दोन सामन्यात 10 बळी घेतले. आकाश हा मुकेशसह अलीकडच्या काही वर्षांत रेड बॉल क्रिकेटमध्ये बंगालचे आघाडीचे गोलंदाज आहेत. आकाशने 30 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 23.58 च्या सरासरीने 104 बळी घेतले आहेत.
जर रांचीची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल असेल तर रोहित शर्मा आणि कंपनी अतिरिक्त फिरकीपटूची निवड करू शकते. राजकोटमध्ये इंग्लिश संघाने फिरकीपुढे नांगली टाकली. लोकल बॉय रवींद्र जडेजाने 13व्यांदा पाच बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यामुळे बुमराहच्या जागी फिरकीपटू निवडण्याचा विचार केल्यास अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदरची निवड केली जाऊ शकते. फिरकी विभागात विविधता आणण्यासाठी अक्षराला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले होते. तर दुसरीकडे इंग्लंडच्या गेल्या भारत दौऱ्यानंतर सुंदरने जवळपास तीन वर्षांत एकही कसोटी खेळलेली नाही.