Indonesia Open : सिंधू, साईप्रणीत उपांत्यपूर्व फेरीत | पुढारी

Indonesia Open : सिंधू, साईप्रणीत उपांत्यपूर्व फेरीत

बाली : वृत्तसंस्था

भारताची आघाडीची बॅडमिंटन खेळाडू (Indonesia Open) पी. व्ही. सिंधूने जर्मनीच्या युवोने ली वर सरळ गेममध्ये विजय मिळवत इंडोनेशिया सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. यासोबतच पुरुष एकेरीत बी. साईप्रणीत व पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने देखील उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. किदाम्बी श्रीकांतला मात्र पराभूत व्हावे लागले.

तिसर्‍या मानांकित सिंधूला दुसर्‍या फेरीतील लढतीत जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. तिने जर्मनीच्या या खेळाडूला 37 मिनिटांत 21-12, 21-18 असे पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सिंधूने पहिला गेम 21-12 असा सहज आपल्या नावे केला. यामध्ये तिने सलग सात गुणांची कमाई केली. (Indonesia Open)

दुसर्‍या गेममध्ये जर्मनीच्या खेळाडूने सिंधूला चांगली टक्‍कर दिली; पण सिंधूने आपला फॉर्म कायम ठेवत गेम 21-18 असा आपल्या नावे करीत सामनादेखील जिंकला. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूसमोर दक्षिण कोरियाच्या सीम युजिनचे आव्हान असेल.

पुरुष एकेरीत भारताच्या बी. साईप्रणीतने फ्रान्सच्या क्रिस्तो पोपोवला चुरशीच्या लढतीत 21-17, 14-21, 21-19 असे पराभूत केले. सामन्यातील पहिला गेम जिंकत प्रणीतने चांगली सुरुवात केली; पण दुसर्‍या गेममध्ये पोपोवने बाजी मारत सामना बरोबरीत आणला. तिसर्‍या गेममध्ये देखील प्रणीतला आव्हान मिळाले. प्रणीतने आपला खेळ उंचावत विजय नोंदवला. अन्य पुरुष एकेरीच्या लढतीत दुसर्‍या मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनने किदाम्बी श्रीकांतला 21-14, 21-18 असे पराभूत केले.

पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने कोरियाच्या कांग मिनह्युक व सेओ सेऊंगजाए जोडीला चुरशीच्या लढतीत 21-15, 19-21, 23-21 असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्‍चित केली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना हा मलेशियाच्या गोह झे फेई व नूर इझुद्दीन जोडीशी होणार आहे. (Indonesia Open Badminton)

Back to top button