पर्थ, वृत्तसंस्था : आंद्रे रसेल व शेरफेन रुदरफोर्ड यांनी सहाव्या गड्यासाठी टी-20 (AUS vs WI) मधील विक्रमी भागीदारी साकारल्यानंतर विंडीजने येथील तिसर्या व शेवटच्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला 37 धावांनी पराभवाचा धक्का दिला. ऑप्टस स्टेडियमवरील या औपचारिक लढतीत विंडीजने 5 बाद 79 वरून 6 बाद 220 धावांपर्यंत मजल मारली, तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 5 बाद 183 धावांवर समाधान मानावे लागले. विंडीजकडून रसेल व रुदरफोर्ड यांनी सहाव्या गड्यासाठी 139 धावांची साकारलेली भागीदारी येथे निर्णायक ठरली. हा शेवटचा सामना विंडीजने जिंकला असला, तरी ऑस्ट्रेलियाच्या 2-1 फरकाने मालिका विजयावर येथे शिक्कामोर्तब झाले.
रसेल व रुदरफोर्ड या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चौफेर समाचार घेत एकत्रित 12 षटकार वसूल केले आणि यामुळे विंडीजला 200 धावांचा टप्पा सहज पार करता आला. विजयासाठी 221 धावांचे आव्हान असताना डेव्हिड वॉर्नरने 49 चेंडूंतच 81 धावांची आतषबाजी करत ऑस्ट्रेलियाला फ्लाईंग स्टार्ट मिळवून दिला. मात्र, तो बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या आव्हानातील जणू हवाच निघून गेली. वॉर्नर बाद झाल्यानंतर अन्य फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले आणि सरतेशेवटी त्यांना 20 षटकांअखेर 5 बाद 183 धावांवर समाधान मानावे लागले.
विंडीजचीही पडझड (AUS vs WI)
या लढतीत प्रथम फलंदाजी करणार्या विंडीजची पहिल्या टप्प्यातील पडझड लक्षवेधी ठरली. एकवेळ तर तिसर्या षटकातच त्यांची 3 बाद 17 अशी दाणादाण उडाली होती. त्यातच जलद गोलंदाज जॉन्सनचा एक बाऊन्सर रसेलच्या ग्लोव्हजवर आदळल्यानंतर तो बराच कळवळला; पण तरीही त्याने प्रथमोपचारानंतर डाव पुढे सुरू ठेवला होता. रसेलचा हा धडाका अगदी शेवटच्या षटकापर्यंत चालला. त्याने झम्पाच्या 19 व्या षटकात 3 उत्तुंग षटकार खेचले आणि यामुळे षटकात एकूण 28 धावा वसूल केल्या गेल्या. रसेल शेवटच्या षटकात बाद झाला, त्यावेळी जवळपास 17 हजार प्रेक्षकांनी त्याला उभे राहून मानवंदना दिल्या.
विंडीजच्या डावात सातव्या स्थानी फलंदाजीला आलेल्या रसेलने अवघ्या 29 चेंडूंत 4 चौकार, 7 षटकारांसह 71 धावांची लयलूट केली, तर शेरफेन रुदरफोर्ड 40 चेंडूंत 67 धावांवर नाबाद राहिला.