शाहरूख खान याच्या षटकाराने तामिळनाडू ‘चॅम्पियन’ | पुढारी

शाहरूख खान याच्या षटकाराने तामिळनाडू ‘चॅम्पियन’

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडूने आपला किताब कायम राखला. अंतिम सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकवर विजय मिळवत सलग दुसर्‍यांदा ही स्पर्धा जिंकली. अत्यंत चुरशीने झालेल्या या सामन्यात तामिळनाडूच्या शाहरूख खान याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने निर्धारित 20 षटकांमध्ये सात गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा केल्या. तामिळनाडूने कर्नाटकवर चार गडी राखून मात केली.

दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम श्रेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकला दुसर्‍याच षटकामध्ये पहिला झटका बसला. रोहन कदम हा सलामीवीर भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर करुण नायर बाद झाला. मनीष पांडेच्या रुपात तिसरा गडी तंबूत परतला. कर्नाटकच्या मधल्या फळीमधील फलंदाजांना अपयश आल्यानंतर अभिनवर मनोहर आणि प्रवीण दुबे यांनी चांगली फलंदाजी करत संघाला 150 हून अधिक धावा झळकावण्यास मदत केली. जगदीश सुचितने 7 चेंडूंत केलेल्या 18 धावाही कर्नाटकसाठी महत्त्वाच्या ठरल्या.

धावांचा पाठलाग करणार्‍या तामिळनाडूच्या सलामीवीर हरी निशांत आणि नारायन जगदीशनने चांगली फलंदाजी करीत डावाला सुरुवात केली. परंतु साई सुदर्शन आणि विजय शंकर तसेच संजय यादव यांना नावाला साजेशी खेळी करण्यात अपयश आले. मात्र, शाहरूख खान याने 15 चेंडूंमध्ये 33 धावांची दमदार खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला.

शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची गरज असताना शाहरूखने आक्रमक खेळी करीत संघाला सामना आणि स्पर्धा दोन्ही जिंकून दिले. शाहरूखने शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार ठोकला. शाहरूख खानला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला.

मुश्ताक अली चषक स्पर्धेचे आतापर्यंतचे विजेते

वर्ष              विजेता         विरुद्ध           कर्णधार

2006/07   तामिळनाडू   पंजाब           दिनेश कार्तिक
2009/10   महाराष्ट्र        हैदराबाद      रोहित मोटवानी
2010/11   बंगाल          मध्य प्रदेश     मनोज तिवारी
2011/12   बडोदा         पंजाब           पिनल शाह
2012/13   गुजरात        पंजाब           पृथ्वी पटेल
2013/14   बडोदा         उत्तर प्रदेश    आदित्य वाघमोडे
2014/15   गुजरात        पंजाब           मनप्रीत मुनेजा
2015/16   उत्तर प्रदेश   बडोदा          सुरेश रैना
2016/17   ईस्ट झोन     सेंट्रल झोन     मनोज तिवारी
2017/18  दिल्ली          राजस्थान       प्रदीप संगवान
2018/19  कर्नाटक      महाराष्ट्र          मनीष पांडे
2019/20  कर्नाटक      तामिळनाडू     मनीष पांडे
2020/21  तामिळनाडू   बडोदा           दिनेश कार्तिक

Back to top button