
पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravi Shastri : भारतीय क्रिकेट संघ लवकरच विश्वचषक जिंकताना दिसेल. जरी एकदिवसीय क्रिकेटचा जगज्जेता होता आले नसले तरी टी-20 क्रिकेटमध्ये मेन इन ब्ल्यू इतर संघांसाठी एक मोठे आव्हान असेल. त्यामुळे टीम इंडिया पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक विजेतेपदाची मोठी दावेदार आहे, अशी भविष्यवाणी संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2023 संपून एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. मात्र त्या स्पर्धेची चर्चा काही संपत नाहीये. भारतीय संघ अंतिम सामना जिंकू शकला नसला तरी अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट विश्लेषक आयसीसी स्पर्धा जिंकण्याबद्दल सातत्याने आपले मत मांडत आहेत. शास्त्री (Ravi Shastri) यांनीही भारतीय संघ लवकरच विश्वचषक जिंकताना दिसेल, असे म्हटले आहे.
शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, 'टी-20 फॉरमॅटचा विश्वचषक जिंकण्याची धमक टीम इंडियामध्ये आहे. आपल्याकडे अनेक अणुबॉम्बसारखे खेळाडू आहेत. तुम्हाला फक्त त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. विश्वचषकासारखी गोष्ट तुम्हाला इतक्या सहजासहजी मिळत नाही. तो जिंकण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. वर्ल्ड कप फायनलसारख्या मोठ्या मंचावर तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. सचिनसारख्या खेळाडूला यासाठी 6 विश्वचषकांची प्रतीक्षा करावी लागली. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव हृदयद्रावक होता. पण या स्पर्धेतून खेळाडूंनी नक्कीच धडा घेतला असेल. एकदा तुम्ही फायनलमध्ये पोहोचलात की, तुम्ही आतापर्यंत स्पर्धेत काय केले आहे याने काही फरक पडत नाही. अंतिम सामन्यातील खेळ तुम्हाला चॅम्पियन बनवतो. आम्ही विश्वचषक जिंकला नसला तरी आमचा संघ हा खूप मजबूत आहे.'
पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंबाबत शास्त्री म्हणाले की, याबाबत निवडकर्त्यांना निर्णय घ्यावा लागेल. या स्पर्धेला अजून बराच वेळ आहे. आयपीएलवर निवड समितीचे बारकाईने लक्ष असेल. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला संघात स्थान मिळण्याची अधिक शक्यता असते. या स्पर्धेनंतर दोन आठवड्यांनी विश्वचषक होणार आहे. त्यामुळे आयपीएलचा पहिला भाग खूप महत्त्वाचा असेल.