T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामधील वर्ल्डकपच्या तारखा जाहीर | पुढारी

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामधील वर्ल्डकपच्या तारखा जाहीर

दुबई : वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाच्या रुपाने रविवारी जगाला टी-20 क्रिकेटमधील नवा विश्वविजेता मिळाला. आयसीसीने पुढील वर्षी म्हणजे 2022 रोजी होणार्‍या टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या तारखा आणि मैदानांची घोषणा केली आहे. पुढील वर्षीचा विश्वचषक हा ऑस्ट्रेलिया मध्ये खेळवला जाणार असून, 16 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. 13 नोव्हेंबर 2022 रोजी मेलबर्नच्या मैदानावर अंतिम सामना खेळवला जाणार आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पष्ट केले आहे.

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये ॲडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या शहरांमध्ये विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या कालावधीत एकूण 45 सामने खेळवले जाणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) आणि ॲडलेड ओव्हल येथे खेळवले जातील.

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या या टी20 विश्वचषकाचे पूर्ण वेळापत्रक जानेवारीमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. या विश्वचषकातील तिकिटांची विक्रीही जानेवारीमध्येच सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 2020 मध्येच टी-20 विश्वचषक होणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळे हा विश्वचषक 2022 मध्ये होत आहे. या मधील साखळी फेरीतील सामने ब्रिस्बेन, गीलाँग, होबार्ट, पर्थ या चार मैदानांवर खेळवले जातील.

या स्पर्धेमध्ये 12 संघ खेळणार आहेत. (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांगला देश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ सुपर 12 साठी पात्र ठरले आहेत. तर, नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजच्या संघांना पात्रता फेरीतील सामने खेळावे लागणार आहेत. या संघांबरोबर इतर चार संघही पात्रता फेरीमध्ये खेळतील.

Back to top button