कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हत्तीवर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूंची प्रतिमा, शिवकालीन युद्ध कलांची प्रात्यक्षिके, धनगरी ढोल, रणहलगी पथकाचा पारंपरिक बाज, साऊंड सिस्टीमचा दणदणाट आणि ओपन टप जीपमध्ये कोल्हापुरी फेटा व चांदीची गदा घेऊन उभारलेला पै. सिकंदर शेख अशा उत्साही 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखची जल्लोषी मिरवणूक कुस्तीपंढरी कोल्हापुरात काढण्यात आली. तीन- चार तासांच्या मिरवणुकीत भगवे फेटे परिधान केलेले पैलवान, कुस्ती शौकिनांसह क्रीडाप्रेमींनी उत्साही उपस्थिती लावली.(Sikander Sheikh)
श्री शाह विजयी गंगावेस तालमीचा मल्ल सिकंदर शेख याने २०२३ चा 'महाराष्ट्र केसरी' हा मानाचा किताब नुकताच पटकावला. याबद्दल त्याची मिरवणूक व सत्कार सोहळ्याचे आयोजन गंगावेस तालीमच्या वतीने बुधवारी करण्यात आले. पोलिस कर्मचारी तथा तालमीचे पै. संग्राम कांबळे यांनी तालमीचा कोणताही मल्ल 'महाराष्ट्र केसरी' झाल्यावर त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तालमीला ३८ वर्षानंतर 'महाराष्ट्र केसरी'ची गदा मिळवून देणाऱ्या सिकंदर शेखची मिरवणूक काढण्यात आली. बिंदू चौकातून मिरवणुकीस सुरुवात झाली. प्रारंभी गजराजाने सिकंदर शेखला पुष्पहार घातला.
यावेळी करवीरचे प्रांताधिकारी हरिष धार्मिक, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, वस्ताद विश्वास हारुगले, तालमीचे अध्यक्ष दीपक जाधव, पै. बाबा राजेमहाडिक, पै. संग्राम कांबळे, मावळा कोल्हापूरचे अध्यक्ष उमेश पोवार, उदय देसाई, सर्जेराव चव्हाण, पै. तुकाराम पाटील, धनाजी बिरंजे, राहुल जानवेकर, अनिकेत मोरे, अमर जाधव आदी उपस्थित होते. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे गंगावेस तालीम असा मिरवणुकीचा मार्ग होता. मिरवणुकीनंतर तालमीचे ज्येष्ठ मल्ल, सिकंदरचे आई-वडील, वस्ताद विश्वास हारुगले यांचा विशेष सत्कार तालमीच्या प्रांगणात करण्यात आल्या.
महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेखची मिरवणूक हत्ती, पारंपरिक वाद्ये, साखर-पेढे वाटप अशा स्वरूपाची काढण्याची घोषणा श्री शाहू विजयी गंगावेस तालीम मंडळाकडून करण्यात आली होती. मात्र, हा पारंपरिक बाज साऊंड सिस्टीमचा दणदणाट आणि स्क्रिनच्या झगमगाटात पूर्णपणे लपून गेला होता. एरव्ही शिस्तबद्ध मानल्या जाणाऱ्या पैलवानांनीही इतरांप्रमाणेच अनावश्यक गोष्टींना महत्त्व दिल्याच्या प्रतिक्रिया कुस्तीप्रेमींमधून व्यक्त करण्यात आल्या.
हेही वाचा