टी-20 वर्ल्डकपमध्ये विक्रमांचे डोंगर : भारतीय खेळाडूंची पाटी कोरीच | पुढारी

टी-20 वर्ल्डकपमध्ये विक्रमांचे डोंगर : भारतीय खेळाडूंची पाटी कोरीच

दुबई ; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) यजमानपदाखाली संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आलेली टी-20 वर्ल्डकप स्पर्धा संपली. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद पटकावले. या विश्वचषकात विक्रमांचे डोंगर उभारले गेले. फलंदाजांनी षटकार-चौकारांची बरसात केली.

तसेच, गोलंदाजांनी धडाधड विकेटस्ही काढल्या. आता या विश्वचषकात घडलेल्या विक्रमांची संपूर्ण आकडेवारीच समोर आली आहे. मात्र, या यादीत भारतीय खेळाडूंच्या नावावर एकाही वैयक्तिक विक्रमाची नोेंद झालेली नाही.

सर्वाधिक धावा : बाबर आझम

बाबर आजमयंदाच्या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा मान पाकिस्तानच्या बाबर आझमने 303 धावा फटकावत मिळवला. तसेच, विश्वचषकात सर्वाधिक 4 अर्धशतकेही बाबर आझमनेच ठोकली.

सर्वाधिक धावा करणारे ‘टॉप 5’ फलंदाज असे : बाबर आझम (303), डेव्हिड वॉर्नर (289), मोहम्मद रिझवान (281), जोस बटलर (269), सी. असलंका (231). भारताकडून सर्वाधिक 194 धावा लोकेश राहुलने केल्या.

सर्वाधिक विकेटस् वानिंदू हसरंगा

वानिंदू हसरंगाया विश्वचषकात एकूण 526 विकेटस् पडल्या. त्यातील सर्वाधिक बळी श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने टिपले. त्याने एकूण 16 बळी घेतले. सर्वाधिक बळी घेणारे ‘टॉप 5’ गोलंदाज पुढीलप्रमाणे आहेत. वानिंदू हसरंगा (16 बळी), अ‍ॅडम झम्पा (13 बळी), ट्रेंट बोल्ट (13 बळी), जोश हेझलवूड (11 बळी), शाकिब-अल- हसन (11 बळी). भारताकडून सर्वाधिक 7 बळी जसप्रीत बुमराहने घेतले.

जोस बटलरसर्वाधिक षटकार : जोस बटलर

या विश्वचषकात एकूण 405 षटकार ठोकले गेले. त्यातील सर्वाधिक 13 षटकार जोस बटलरने ठोकले. तसेच, एका डावात सर्वाधिक नाबाद 101 धावा करण्याचा विक्रमही जोस बटलरनेच नोंदवला.

शोएब मलिक

वेगवान अर्धशतक : शोएब मलिक

या वर्ल्डकप मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक फटकावण्याचा मान पाकिस्तानच्या शोएब मलिकने पटकावला. त्याने 18 चेंडूंत नाबाद 54 धावांची खेळी केली.

डावात सर्वाधिक धावा : भारत

या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणार्‍या भारतीय संघातील एकाही खेळाडूला फलंदाजी, गोलंदाजीत अव्वल 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. केवळ सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा (अफगाणिस्तान विरुद्ध 2 बाद 210 धावा) फटकावण्याचा विक्रम वगळता कुठलाही विक्रम भारतीय संघाला करता आला नाही.

Back to top button