पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games Kabaddi : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज (2 ऑक्टोबर) भारतीय महिला संघाने आपल्या मोहिमेला प्रारंभ केला. मात्र ही सुरुवात समाधानकारक ठरली नाही. अ गटाच्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाला चायनीज तैपेईने कडवे आव्हान दिले. पहिल्या हाफमध्ये भारतीय संघ आघाडीवर होता पण दुसऱ्या हाफमध्ये 2018 च्या कांस्यपदक विजेत्या चायनीज तैपेईने झुंझार कमबॅकरून टीम इंडियाला बॅकफुटवर ढकलले. अशातच भारताला हा सामना 34-34 असा बरोबरी राखण्यात यश आले.
भारत विरुद्ध चायनीज तैपेई सामन्याची सुरुवात उत्साहात झाली. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच एकमेकांवर वर्चस्व गाजवले. रितू नेगीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या साक्षी कुमारी, पुष्पा राणा, निधी शर्मा, पूजा नरवाल, पूजा काजला आणि अक्षीमा बज्जाद यांच्या आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले आणि पहिल्या हाफमध्ये चायनीज तैपेईला ऑलआऊट केले. पूजाने भारतासाठी पहिला पॉइंट मिळवला आणि प्रत्युत्तरात तैपेईच्या खेळाडूने बोनससह आघाडी घेतली, पण कर्णधार रितू नेगीने टॅकल पॉइंट घेत भारताला बरोबरीत आणले. (Asian Games Kabaddi)
त्याचवेळी, पहिला हाफ संपण्यासाठी एक मिनिट शिल्लक असताना पूजाने तिच्या उत्कृष्ट मल्टी रेड पॉईंटसह चायनीज तैपेई संघाला ऑलआऊट केले. पण पुढच्या काही क्षणात चायनीज तैपेईने निधीला टॅकल केले आणि दोन गुण जिंकले. अशाप्रकारे भारतीय संघाने पहिल्या हाफपर्यंत 17-15 अशी आघाडी कायम ठेवली. (Asian Games Kabaddi)
हाफ टाईमनंतर पूजाने आपल्या पहिल्या चढाईत बोनस गुण मिळवत भारताची गुणसंख्या वाढवली. यानंतर भारतीय मुलींनी लागोपाठ गुणांची कमाई करत गुणसंख्या 21-16 पर्यंत नेली. पुढच्याच क्षणी रितू नेगीने टॅकल पॉइंट घेत गुणसंख्या आणखी दोन गुणांनी वाढवली. उत्तरार्धात भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व कायम राखले, परंतु चायनीज तैपेईच्या खेळाडूंनी लवकरच आपल्या चढाई आणि टॅकल पॉइंटने जबरदस्त पुनरागमन केले आणि गुणसंख्या 27-27 अशी बरोबरी आणली. निधी शर्माने तिच्या पुढच्या चढाईत बोनससह टच पॉइंट मिळवून आघाडी मिळवली, पण चायनीज तैपेईने सामन्यात प्रथमच भारताला सर्वबाद करून गुणसंख्या वाढवली. सामन्याची वेळ संपुष्टात येत होती. त्यावेळी चायनीज तैपेईचा संघ एका गुणाने आघाडीवर होता. भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. पण भारताने शेवटच्या क्षणी गुण मिळवून 34-34 अशी बरोबरी साधली.
या सामन्यात भारतीय महिला संघाने 12 बोनस गुण मिळवले, तर चायनीज तैपेईने 13 बोनस गुण मिळवले. भारतीय महिला संघ आपला पुढील सामना गुरुवारी दक्षिण कोरियाविरुद्ध खेळणार आहे, तर भारतीय पुरुष कबड्डी संघ मंगळवारी बांगलादेशविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. गटातील अव्वल दोन संघ शुक्रवारी उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.