पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याने हाँगझोऊ एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) रविवारी (1 ऑक्टोबर) इतिहास रचला आहे. त्याने या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने 8:19:53 मिनिटांमध्ये ही शर्यत पूर्ण केली. याचबरोबर भारताच्या खात्यात 12 व्या सुवर्णपदकाची भर पडली आहे. दरम्यान, आज दिवसभरातील हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे.
3000 मीटर स्टीपलचेसमध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 1951 मध्ये सुरू झाल्या आणि तेव्हापासून 3000 मीटर स्टीपलचेस (पुरुष) स्पर्धा सुरू झाल्या, परंतु भारताच्या एकाही खेळाडूने त्यात सुवर्णपदक जिंकले नव्हते. अविनाश साबळेने हा दुष्काळ संपुष्टात आणला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे अॅथलेटिक्समधील चौथे पदक आहे. याआधी किरण बालियानने महिलांच्या शॉटपुटमध्ये कांस्य, कार्तिक कुमारने पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत रौप्य आणि गुलवीर सिंगने कांस्यपदक जिंकले होते.
राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता भारताचा 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील निराशाजनक कामगिरी केली होती. पण ती कामगिरी विसरुन तो हाँगझोऊ एशियन गेम्समध्ये उतरला. त्याने राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण पदक मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून आलेला साबळेने गेल्या महिन्यात हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत पहिल्या हिटमध्येच सातव्या स्थानावरुन बाहेर पडला होता. त्यामुळे त्याला अंतिम फेरीत धावता आले नाही. पण ते अपयश मागे टाकून त्याने आशियाई स्पर्धेत सर्वश्रेष्ठ कामगिरी नोंदवली आणि सुवर्णपदक मिळवून दाखवले. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये माझ्याकडून चुका झाल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा आत्मविश्वास मिळवणे थोडे कठिण गेले. पण आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारच असा मी निर्धार केला होता. त्यासाठी खूप प्रयत्न केले. अखेर त्यात यश आले आहे, अशी भावना साबळेने व्यक्त केली.