टी-20 विश्‍वकरंडक : वेस्ट इंडिज स्पर्धेबाहेर - पुढारी

टी-20 विश्‍वकरंडक : वेस्ट इंडिज स्पर्धेबाहेर

अबुधाबी; वृत्तसंस्था : टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत गतविजेच्या वेस्ट इंडिज ला जबर धक्‍का बसला आहे. श्रीलंकेने झुंजार खेळ दाखवत वेस्ट इंडिज ला 20 धावांनी नमवले आणि स्पर्धेबाहेर ढकलले. विंडीजचा कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आधीच स्पर्धेबाहेर गेलेल्या श्रीलंकेने मुक्‍तपणे फलंदाजी करीत 20 षटकांत 3 बाद 189 धावा उभारल्या. लंकेकडून सलामीवीर पाथुम निसांका आणि चरिथ असलांका यांनी दमदार अर्धशतके ठोकली. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजला 20 षटकांत 8 बाद 169 धावांपर्यंतच पोहोचता आले. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो, करुणारत्ने आणि हसरंगा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत विंडीजला गुडघे टेकवण्यास भाग पाडले.

तत्पूर्वी, पाथुम निसांका आणि यष्टिरक्षक कुसल परेरा यांनी लंकेच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी 42 धावांची सलामी दिली. त्यानंतर चरिथ असलांकाने निसांकासोबत संघाला शतकी पल्ला गाठून दिला. 16 व्या षटकात निसांका (51) तर 19 व्या षटकात असलांका (68) बाद झाला. या दोघांनंतर कर्णधार दासुन शनाकाने आक्रमक 25 धावा ठोकल्यामुळे संघाने 189 धावा फलकावर लावल्या. आंद्रे रसेलने 33 धावांत तीन विकेटस् घेतल्या.

Back to top button