पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत सर्वात हाय व्होल्टेज भारत-पाकिस्तान ( IND vs PAK Asia Cup ) सामना शनिवार, २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे झाला. मात्र दुसर्या डावात पावसाचा खेळ झाला. अखेर हा सामना रद्द करण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला या दोघांनाही स्वस्तात तंबूत धाडले. शाहीदच्या या कामगिरीचे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी खूप कौतुक केले. हे साहजिकच आहे. मात्र त्यांनी त्याचबरोबर एक ट्विट करत रोहित आणि विराटची खिल्ली उडवली आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तानमधील क्रिकेट सामना हा चाहत्यांसह सर्वांसाठी महत्त्वाचा असतो. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतरही असेच घडले. पावसामुळे सामना रद्द करण्यात आला; पण गोलंदाजीत पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी चमकदार कामगिरी केली. भारताकडून हार्दिक पंड्या आणि इशान किशन यांनी स्मरणीय खेळी करत भारताचा डाव सावरला. ( IND vs PAK Asia Cup )
शाहिनला पहिल्या षटकात एकही विकेट मिळाली नाही; पण त्याने पहिल्याच चेंडूपासून भारतीय फलंदाजांवर दडपण ठेवले. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना लवकर बाद करण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न होता. या सामन्यात शाहिन निष्प्रभ ठरेल असे वाटत होते. मात्र, पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि यानंतर सामना सुरु झाल्यानंतर शाहीन वेगळ्याच रुपात दिसला. त्याला लय सापडली.पावसानंतर खेळ सुरू झाला तेव्हा शाहिनने चौथ्या चेंडूवरच भारतीय कर्णधार रोहितला बाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात त्याने विराट कोहलीला बाद केले.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ हे शनिवारी शाहीनच्या गोलंदाजीने प्रभावित झाले. त्याचे कौतूक करण्यासाठी त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) "ते खेळू शकत नाहीत," अशी पोस्ट केली. ही पोस्ट लगेच व्हायरल झाली आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाझ देखील शरीफ यांची री ओढत "ते त्याला खेळू शकत नाहीत." अशी पोस्ट केली.
हेही वाचा :