पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit vs Virat Asia Cup : आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. 2019 नंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना (IND vs PAK ODI Match) खेळण्यासाठी मैदानावर उतरतील. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रन मशिन विराट कोहली (Virat Kohli) कसे प्रदर्शन करतील याची उत्सुकता लागून राहिली आहे.
2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK ODI Match) यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना झाला होता. ज्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. 2012 ते 2023 या कालावधीत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK ODI Match) यांच्यात एकूण 12 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी आठ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने चार लढती जिंकल्या आहेत. या 12 सामन्यांमध्ये सहा वेळा भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानविरुद्ध शतके ठोकली आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat kohli) यांनी प्रत्येकी दोनदा, तर महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी प्रत्येकी एकदा अशी कामगिरी केली आहे.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK ODI Match) यांच्यात एकदिवसीय आशिया कपमध्ये आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 7, तर पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. आकडेवारी पाहता, टीम इंडियाचे पारडे जड राहिले आहे. मात्र, 50-50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाने एकूण विक्रमात भारतावर वर्चस्व राखले आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 132 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने 55, तर पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) कधीही पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळू शकले नाहीत. रोहितने (Rohit Sharma) पाकिस्तानविरुद्ध 16 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत, तर विराटने (Virat Kohli) कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 13 वनडे आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. (Rohit vs Virat Asia Cup)
यादरम्यान, रोहितने 16 एकदिवसीय सामन्यांत 51.42 च्या सरासरीने 720 आणि 11 टी-20 मध्ये 118.75 च्या स्ट्राइक रेटने 114 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, विराटने पाकिस्तानविरुद्धच्या 13 एकदिवसीय सामन्यांत 48.72 च्या सरासरीने 536 आणि 10 टी-20 मध्ये 81.33 च्या सरासरीने आणि 123.85 च्या स्ट्राइक रेटने 488 धावा केल्या आहेत.
रोहित-विराट पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या 15 आंतरराष्ट्रीय (वनडे आणि टी-20) सामन्यांमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड राहिले आहे. भारतीय कर्णधाराने 15 डावांमध्ये 561, तर कोहलीने 13 डावात 671 धावा केल्या आहेत. या काळात रोहितने दोन शतके आणि तीन अर्धशतके, तर कोहलीने एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत.
एकदिवसीय आशिया चषक (ODI Asia Cup) स्पर्धेतील सामन्यांतही रोहितचे पाकिस्तानविरुद्धचे रेकॉर्ड चांगले राहिले आहे. या कालावधीत त्याने सात सामन्यांच्या सात डावांमध्ये 73.40 च्या सरासरीने 367 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी, कोहलीने तीन सामन्यांच्या तीन डावात 68.66 च्या सरासरीने 206 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे.
रोहित पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या चार आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (4, 28, 12, 0) अपयशी ठरला आहे. तर कोहलीने या चार सामन्यांमध्ये नाबाद 82, 60, 35 आणि 57 धावा केल्या. अशा स्थितीत रोहितकडून शनिवारच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध धावा करणे अपेक्षित आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) मोठा विक्रम करण्याची संधी आहे. तो या फॉरमॅटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. सर्वात कमी डावांमध्ये 10 हजार धावा करणारा तो दुसरा क्रिकेटर बनू शकतो. अशा प्रकारे रोहितकडे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) विक्रम मोडण्याची संधी आहे.
भारतीय कर्णधाराला एकदिवसीय 10,000 धावा पूर्ण करण्यासाठी 163 धावांची गरज आहे. तो हा टप्पा आशिया कप दरम्यान सहज करू शकतो. यात त्याला यश आलेच तर तो सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजांच्या पुढे जाईल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 205 डावांमध्ये 10,000 धावा करण्याचा विश्वविक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, तर सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 259 डावात हा पराक्रम केला. त्याचवेळी सौरव गांगुलीने 263 डावांमध्ये आणि रिकी पाँटिंगने 266 डावांमध्ये हा पराक्रम केला, तर जॅक कॅलिसने 272 आणि एमएस धोनीने 272 डावांमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.