नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या एच. एस. प्रणय याने कांस्यपदक मिळवले. थायलंडच्या कुनलावूत वितिदसर्न याच्याकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे प्रणॉयच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या आशांना सुरुंग लागला.
उपांत्य फेरीच्या लढतीत प्रणयने पहिला गेम जिंकत आघाडी घेतली होती. दुसर्या गेममध्येही त्याच्याकडे 5-1 अशी आघाडी होती, पण त्यानंतरही प्रणयला या लढतीत विजय मिळवता आला नाही. तो 18-21 21-13 21-14 असा पराभूत झाला.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन
जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणार्या एच. एस. प्रणयचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या शुभसंदेशात म्हटले आहे की, प्रणयचे कौश्यल्य आणि परिश्रमाची चमक संपूर्ण स्पर्धेत पसरली होती. विश्व चॅम्पियनशिपमध्ये प्रणयने मिळवलेले यश शानदार आहे. कांस्यपदक प्राप्तीबद्दल प्रणयचे अभिनंदन!
गेली 12 वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेतील पदकाचे मोल मोठे आहे. मला सुवर्णपदक पटकावता आले नसले तरी ब्राँझपदक मिळवल्याचे समाधान आहे.
– एच. एस. प्रणॉय, ब्राँझपदक विजेता