…संपूर्ण भारत आपल्या पाठीशी; स्कॉटलंड संघाच्या खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल | पुढारी

...संपूर्ण भारत आपल्या पाठीशी; स्कॉटलंड संघाच्या खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल

दुबई : पुढारी ऑनलाईन

मार्टीन गप्टीलच्या धडकाकेबाज फलंदाजीच्या जोरावर (९३) न्यूझीलंडने स्कॉटलंड विरुद्ध सामना जिंकला. न्यूझीलंडने स्कॉटलंडला ५ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावांचे आव्हान दिले होते. स्कॉटलंडने देखिल न्यूझीलंडला कडवा प्रतिकार करत निर्धारीत २० षटकामध्ये ५ गड्यांच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या व हा सामना केवळ १६ धावांनी गमावला.

न्यूझीलंडचे फलंदाज मार्टीन गप्टील आणि ग्लेन फिलिप्स यांनी ७३ चेंडूत १०५ धावांची भागिदारी रचली. या खेळाडुंच्या जोरावर न्यूझीलंडने १७३ धावांपर्यंत मजल मारली. तर स्कॉटलंडच्या सफयान शरीफ आणि ब्रँडली वील यांनी प्रत्येकी दोन – दोन बळी घेतले. तसेच मार्क व्हॅट याने एक बळी मिळवला.

दरम्यान हा सामना सुरु असतानाचा एक अनोखा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. स्कॉटलंडचा संघ जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा त्यांच्या विकेटकीपर मॅथ्यू क्रॉस आपला सहकारी लेग स्पीनर कॉलिन ग्रीव्स याला अत्यंत अनोख्या पद्धतीने प्रोत्साहन दिले. या व्हिडिओ मध्ये मॅथ्यू क्रॉस हा कॉलिन ग्रीव्सला म्हणत आहे की, कमऑन ग्रीव्स… संपूर्ण भारत आपल्या पाठिशी उभा आहे. (Common Greaves, whole of India is behind you, yeah Greavo). हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दोन सामन्यांमध्ये पराभूत झालेल्या भारतीय संघास सेमीफायनलमध्ये पोहचायचा असेल तर अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. या स्थिती वरुनच स्कॉटलंड संघाच्या विकेटकीपरने आपल्या गोलंदाजाला अशा अनोख्या पद्धतीने प्रोत्साहीत केले.

या सामन्या बाबत बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी समाधानकारक फलंदाजी केली. संघाने पावरप्लेमध्ये दोन बळी गमावत ५२ धावा बनवल्या होत्या. डॅरेल मिशेल १३ धावा करुन तर कर्णधार केन विल्यमसन हा शून्यावर बाद झाला होता. तर यांच्यानंतर कॉनवे देखिल १ धाव करुन बाद झाला. यानंतर आलेल्या फिलिप्स आणि गप्टील यांनी मोठी भागिदारी रचत न्यूझीलंड संघास मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवले.

गप्टील याने आपले अर्धशतक पूर्ण करत १५ षटकात संघाची धावसंख्या १०० पर्यंत पोहचवली. १९ व्या षटकात फिलीप्स हा जलदगतीने धावासंख्या बनविण्याच्या नादात एक चौकार मारल्यानतंर ३७ चेंडूत ३३ धावा करुन बाद झाला. याच षटकात गप्टील देखिल बाद झाला. त्याने ५७ चेंडू ९३ धावा बनवल्या. यानंतर आलेल्या नीशम याने १० धावा तर मिशेल सँटनर याने २ धावा करुन न्यूझीलंडला १७२ धावांपर्यंत पोहचवले.

Back to top button