India vs Afghanistan : टीम इंडियाला अफगाण ‘चॅलेंज’ - पुढारी

India vs Afghanistan : टीम इंडियाला अफगाण ‘चॅलेंज’

अबुधाबी ; वृत्तसंस्था : खराब फॉर्मचा सामना करीत असलेल्या (India vs Afghanistan) भारतीय क्रिकेट संघाला टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत बुधवारी अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. अफगाणिस्तानचे फिरकी आक्रमण विरुद्ध भारताची तथाकथित मजबूत फलंदाजी असा सामना चाहत्यांना पहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यापूर्वी अंतिम संघ निवड, फलंदाजीचा क्रम या प्रश्‍नांवर संघ व्यवस्थापनाचा कस लागणार आहे. पहिल्या दोन सामन्यांत दुर्लक्ष झालेला आर. अश्‍विनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघासाठी उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानने स्कॉटलंड आणि नामिबियासारख्या संघांना पराभूत करण्यासोबत पाकिस्तानला जवळपास पराभूत केले होते. मोहम्मद नबी आणि राशीद खान यांच्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

शेवटच्या तीन सामन्यांत कोहलीकडून योग्य संघ निवडीची अपेक्षा असेल. अश्‍विनच्या निवडीवर अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. चार वर्षांनंतर त्याला मर्यादित षटकांच्या संघात स्थान देण्यात आले आणि सूत्रांच्या माहितीनुसार कोहली अश्‍विनच्या निवडीवर खूश नव्हता. (India vs Afghanistan)

संघात निवडलेल्या वरुण चक्रवर्तीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. तर, अनुभवी अश्‍विनला संधी मिळत नाही. त्यामुळे भारताला स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवायचे झाल्यास अफगाणिस्तानविरुद्ध फिरकी विभागात कोणाला खेळवायचे यासाठी माथेफोड करावी लागणार आहे.

अफगाणिस्तान संघाकडे हजरतुल्लाह जजाई आणि मोहम्मद शहजादच्या रूपाने चांगले सलामी फलंदाज आहेत. हामीद आणि नवीनुल हक नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यास सक्षम आहेत. दोन खराब सामन्यांनंतर रोहित आणि राहुल पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असतील.

सूर्यकुमार यादव फिट असल्यास खेळेल आणि इशान किशनलादेखील हार्दिक पंड्याऐवजी संधी मिळू शकते. पंड्याने दोन सामन्यांत 35 चेंडूंत 31 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या राशीद खान आणि गुलबदीन नईब यांना भारतीय फलंदाजांना सांभाळून खेळावे लागेल. भारताला आपले आव्हान जिवंत ठेवायचे असल्यास चांगल्या कामगिरीशिवाय पर्याय नाही.

फिरकीपुढे लागणार कस (India vs Afghanistan)

स्पर्धेत टिकून रहायचे असेल तर भारताला हा सामना नुसता जिंकून चालणार नाही. तर, मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. अफगाणिस्तानकडे फिरकी आक्रमण चांगले असून, त्यांनी पाकिस्तानलाही घाम फोडला होता. मात्र, थोडक्यात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे भारताच्या (कागदावर) मजबूत फलंदाजीचा आजही कस लागणार आहे.

8-6
अबुधाबीच्या मैदानावर टी-20 वर्ल्डकपमधील आतापर्यंत 8 सामने झाले आहेत. यापैकी 6 संघांनी धावांचा पाठलाग करून सामने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.

Back to top button