पुढारी ऑनलाईन : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखड याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार याने दिल्लीतील तिहार तुरुंगात शरणागती पत्करली आहे. त्याच्यावर दंगल, बेकायदेशीर जमाव आणि गुन्हेगारी कट यासह ज्युनियर कुस्तीपटूचा खून आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
सागर धनखड खून प्रकरणात जामीन मिळालेला सुशील कुमार २३ जुलै ते ३० जुलै दरम्यान तुरुंगाबाहेर बाहेर होता. त्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन देखील झाले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी १७० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. यात सुशील कुमारला धनखड खून प्रकरणात मुख्य आरोपी बनवले आहे.
मालमत्तेच्या वादातून सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी ४ मे २०२१ रोजीच्या मध्यरात्री दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये २३ वर्षीय सागर धनखड आणि त्याचा मित्र सोनू आणि इतर तिघांवर हल्ला केला होता. यात सागर धनखडचा मृत्यू झाला.
सागर आणि त्याच्या मित्रांनी सुशील कुमारचा फ्लॅट सोडला नसल्याने वाद झाला होता. त्यातून धनखडचा खून झाल्याचे प्राथमिक तपासातून आढळून आले आहे. दिल्ली पोलिसांनी मे २०२१ मध्ये दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशीलला मुंडका परिसरातून अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनखड हा सुशील कुमार यांच्या मालकीच्या दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील एका अपार्टमेंटमध्ये पूर्वी राहत होता. यावरून दोघांत वाद झाला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये दिल्ली न्यायालयाने सुशील कुमारला आठ दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता.
हे ही वाचा :