मँचेस्टर, वृत्तसंस्था : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात मँचेस्टर येथे खेळवण्यात आलेला अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. या सामन्याच्या अनिर्णायक निकालामुळे इंग्लंड संघाचे मोठे नुकसान झाले आहे. यजमानांची 2015 नंतर प्रथमच अॅशेस जिंकण्याची सुवर्णसंधी वाया गेली. या सामन्यात एकवेळ इंग्लंड विजयाच्या जवळ पोहोचले होते. त्यानंतर पावसामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे संघाचा कर्णधार बेन स्टोक्स खूपच निराश झाला आहे. हा आमच्यासाठी खूप कठीण क्षण आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
सामना संपल्यानंतर बेन स्टोक्स म्हणाला, आम्ही पहिले 3 दिवस ज्या प्रकारचे क्रिकेट खेळलो त्याचे परिणाम हवामानाने दिले नाहीत. खरे सांगायचे तर ही एक कठीण गोष्ट आहे, पण तो आमच्या खेळाचा भाग आहे. या सामन्यात येण्यापूर्वी आमच्यासाठी 'करो या मरो' अशी परिस्थिती होती. ऑस्ट्रेलियाला 320 च्या आसपास आऊट करणे आणि नंतर 590 धावा करणे, आम्ही याच्यापेक्षा जास्त काही करू शकलो नसतो.
आता पुढचा सामना खेळताना आम्हाला खूप अभिमान वाटेल. बेन स्टोक्स पुढे म्हणाला, आमचा एक सामना बाकी आहे आणि आम्हाला विजय मिळवून 2019 प्रमाणे ही मालिका बरोबरीत राखायची आहे. हा शेवटचा सामना एक संघ म्हणून आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला आहे आणि आशा आहे की गर्दी पुन्हा जमेल आणि आम्ही जिंकू.
ऑस्ट्रेलियाने अॅशेस ट्रॉफी आपल्याकडे कायम राखली (ENG vs AUS)
चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहिल्यानंतरही ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत इंग्लंडने शेवटचा सामना जिंकला तरी मालिका अनिर्णीत राहील. अॅशेसच्या नियमांनुसार, मालिका अनिर्णीत राहिल्यास, मागील मालिका जिंकलेल्या संघाकडे अॅशेस ट्रॉफी राहते. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाने मागील मालिका जिंकली होती, त्यामुळे ही मालिका पुन्हा एकदा त्यांच्या नावावर होणार आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 317 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये मार्नस लॅबुशेन (51) आणि मिचेल मार्श (51) यांनी अर्धशतके झळकावली होती. इंग्लंडने पहिल्या डावात 592 धावांची मजल मारली. यात जॅक क्रॉलीच्या 189 आणि जॉनी बेअरस्टोच्या नाबाद 99 धावांचा समावेश होता. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लंडने 275 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात पावसाने सामना अनिर्णीत होण्यापूर्वी 5 बाद 214 धावा केल्या होत्या.