होव; वृत्तसंस्था : 'सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळ करीत असून, दबावात खेळण्याचा आनंद घेत आहे,' असे मत इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विजयाची शिल्पकार ठरलेली अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने व्यक्त केले. इंग्लंडची सलामी फलंदाज टॅमी ब्यूमोंट (59) आणि कर्णधार हीथर नाईट (30) या दोघीही चांगला खेळ करीत असताना दीप्तीने 14 व्या षटकात ही भागीदारी मोडीत काढली. त्यामुळे भारताला सामन्यात पुनरागमन करता आले.
सामना संपल्यानंतर दीप्ती शर्मा म्हणाली की, 'मला दबावजन्य परिस्थितीत खेळायला आवडते. मग फलंदाजी, गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण. मला आपल्या विभागात योगदान देऊन संघाला पुढे आणायचे आहे. पुढे येऊन नेतृत्व करणे मला आवडते. मी जेव्हा स्थानिक क्रिकेटमध्ये सीनिअर खेळाडू म्हणून खेळते तेव्हा संघाला सामना जिंकवून देते. मी परिस्थितीचे आकलन करून त्यानुसार खेळ करते. त्यामुळे मला खेळणे सोपे वाटते. कारण, सर्व गोष्टींचा मी सहजपणे सामना करू शकते.'
दीप्ती शर्माने 14 व्या षटकात ब्यूमोंटला बाद केले आणि नंतर नाईटला बाद करीत तिने इंग्लंडला अडचणीत आणले. इंग्लंडला त्यावेळी विजयासाठी 36 चेंडूंत 43 धावांची गरज होती. नंतर भारतीय स्पिनर्सने चांगली कामगिरी केली. दीप्ती म्हणाली की, 'हे महत्त्वपूर्ण षटक होते. तसेच विकेटदेखील तितकीच महत्त्वाची होती.
यापूर्वीदेखील आम्ही डीआरएस घेतला होता. मात्र, नशिबाने आम्हाला साथ दिली नाही. यावेळी मात्र चेंडू स्टम्पवर लागत होता. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. यानंतर आणखीन एका फलंदाजाला रनआऊट केल्याने आम्हाला पुनरागमन करण्यास मदत झाली.'