SCO vs NAM : नाम्बिबियाने सुपर १२ मधला आपला पहिला विजय साकारला - पुढारी

SCO vs NAM : नाम्बिबियाने सुपर १२ मधला आपला पहिला विजय साकारला

दुबई : पुढारी ऑनलाईन

आयसीसी टी २० वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच पात्र ठरलेल्या नाम्बिबियाने आपला सुपर १२ मधील पहिलाच सामना जिंकून इतिहास रचला. त्यांनी स्कॉटलंडचा ४ विकेट्सनी पराभव केला. नाम्बिबियाच्या रुबेन ट्रम्प्लेमनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर स्कॉटलंडला १०९ धावात रोखले. त्यानंतर हे आव्हान नाम्बिबियाने सावध फलंदाजी करत ६ फलंदाजांच्या मोबदल्यात २० व्या षटकात पार केले. स्कॉटलंडनेही प्रभावी मारा करत नाम्बिबियाला विजयासाठी चांगलेच झुंजवले.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याऱ्या नाम्बिबियाने स्कॉटलंडच्या वरच्या फळीची धुळदाण उडवून दिली. रुबेन ट्रम्प्लेमनने पहिल्याच चेंडूवर मुन्सेचा त्रिफळा उडवला. त्यानंतर याच षटकात त्याने मॅक्लॉईड आणि बेरिंगटन यांना बाद करत स्कॉटलंडची अवस्था ३ बाद २ धावा अशी केली.

या वाईट सुरुवातीनंतर लीक्सने स्कॉटलंडचा डाव सावरला. त्याने २७ चेंडूत केलेल्या ४४ धावांमुळे स्कॉटलंड शंभरी पार करु शकला. त्याला क्रॉसने १९ तर क्रिस ग्रेव्हियसने २५ धावा करुन चांगली साथ दिली.

हेही वाचा : वर्णभेद विरोधी अभियान : क्विंटन डिकॉक याने आफ्रिकन बोर्डाचे फेटाळले निर्देश

११० धावांचे माफक आव्हान घेऊन मैदनात उतलेल्या नाम्बिबियानेही संथ सुरुवात केली. क्रेग विलियम्स आणि लिंगेनने २८ धावांची सावध सलामी दिली. त्यानंतर लिंगेन बाद झाला. दहाव्या षटकात विलियम्स आणि ग्रीन यांनी नाम्बिबियाचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र त्यानंतर नाम्बिबियाचा डाव घसरला. ग्रीन ( ९ ) आणि विलियम्स ( २३ ) बाद झाले.

या धक्क्यातून डेव्हिड वीज आणि जेजे स्मिथ यांनी नाम्बिबियाला सावरत शतक पार करुन दिले. मात्र संथ फलंदाजीमुळे चेंडू आणि धावांमधील अंतर कमी झाले होते. त्यातच सेट झालेला वीज १६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ फ्रायलिंकही २ धावा करुन माघारी फिरला. अखेर स्मिथने शेटवच्या षटकात षटकार मारत नाम्बिबियाचा टी २० वर्ल्डकप सुपर १२ मधील पहिला विजय साकार केला. स्मिथने २३ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या.

Back to top button