T20 World Cup : टॉस जितो; मॅच जितो? - पुढारी

T20 World Cup : टॉस जितो; मॅच जितो?

दुबई; वृत्तसंस्था : संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत एक नवा ट्रेंड समोर येऊ लागला आहे. यूएईमधील वातावरणात प्रथम फलंदाजी करणे लाभदायक ठरू लागले आहे. ‘सुपर-12’मध्ये झालेल्या पहिल्या सात सामन्यांत पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाने विजय मिळविला आहे. तर, केवळ एकच संघ प्रथम फलंदाजी करताना विजयी झाला आहे.

संथ खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे अवघड

सामना अबुधाबीत असो वा शारजाह किंवा दुबईत प्रथम फलंदाजी करताना टार्गेट निश्चित करणे सर्व संघांना अवघड बनू लागले आहे. पहिल्या सात सामन्यांत प्रथम फलंदाजी करणार्‍या केवळ एकाच संघाने 170 हून जास्त धावा काढल्या आहेत.

दव पडल्यानंतर फलंदाजी करणे बनते सोपे (T20 World Cup)

संयुक्त अरब अमिरातमध्ये रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दव पडते. यामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळविणे अत्यंत अवघड बनते. यामुळे फलंदाजी करणे सोपे बनते, असेच चित्र स्पर्धेत आतापर्यंत दिसून आले आहे. याचा फायदा टार्गेट नजरेसमोर ठेवून फलंदाजी करणार्‍या संघाला होत आहे. तसे पाहिल्यास दवाचा परिणाम कमी करण्यासाठी केमिकलचा वापरही करण्यात येत आहे. मात्र, याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही.

आयपीएलमध्येही दिसला हाच ट्रेंड

‘आयपीएल-2021’च्या सत्रातील 31 सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये झाले. या सामन्यांमध्येही प्रथम क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाचेच वर्चस्व दिसून आले. 31 पैकी 21 सामने प्रथम क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाने जिंकले आहेत. याचा अपवाद राहिला तो अंतिम सामन्याचा. या लढतीत प्रथम फलंदाजी करणार्‍या चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला नमवून विजेतेपद पटकावले होते.

टी-20 क्रमवारीत विराट पाचव्या स्थानावर

नवी दिल्ली : आयसीसी टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावूनही तो टी-20 क्रमवारीत चौथ्यावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. तर, टीम इंडियाचा सलामी फलंदाज के. एल. राहुल याला दोन स्थानांचे नुकसान झाले असून, तो आठव्या स्थानी घसरला आहे. पाकचा सलामी फलंदाज मोहम्मद रिझवानने तीन स्थानांची सुधारणा करीत कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचा अ‍ॅडम मार्करामने तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान (831) व पाकचा कर्णधार बाबर आझम (820) हे अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या स्थानी आहेत.

Back to top button