PAK vs NZ : शोएब मलिकचा अनुभव पाकिस्तानच्या आला कामी | पुढारी

PAK vs NZ : शोएब मलिकचा अनुभव पाकिस्तानच्या आला कामी

शारजाह : पुढारी ऑनलाईन

PAK vs NZ : पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिकने निम्मा संघ माघारी गेला असताना अक्रमक खेळी करणाऱ्या आसिफ सोबत ६ व्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावरच पाकिस्तानने न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव केला. शोएब मलिकने नाबाद २६ धावा केल्या तर आसिफ अलीने १२ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकार मारत २७ धावा ठोकल्या. मोहम्मद रिझवाननेही ३३ धावांची चिवट खेळी केली. न्यूझीलंडकडून इश सोधीने २८ धावा देत सर्वाधिक २ विकेट घेतल्या.

न्यूझीलंडने ठेवलेल्या १३५ धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतललेल्या पाकिस्ताची ( PAK vs NZ ) सुरुवात संथ झाली. न्यूझीलंडने संथ होत असलेल्या विकेटचा फायदा उचलत बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला पॉवर प्लेमध्ये फार हात खोलण्याची संधी दिली नाही. याच दबावात सहव्या षटकात बाबर आझम साऊदीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

बाबर बाद झाल्यानंतर आलेल्या फकर जमानलाही मोठे फटेक मारता आले नाही. तोही १७ चेंडूत ११ धावा करुन सोधीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर सँटनरने  ६ चेंडूत ११ धावांची छोटेखानी खेळी करणाऱ्या पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफीजला  पॅव्हेलियन धाडले. यामुळे पाकिस्तानची अवस्था ११ षटकात ३ बाद ६३ धावा अशी झाली.

भारतीय वंशाच्या इश सोधीने पुन्हा एकदा पाकिस्तानला मोठा धक्का दिला. त्याने ३४ चेंडूत ३३ धावांची खेळी चिवट खेळी करणाऱ्या मोहम्मद रिजवानला बाद केले. रिझवाननंतर इमाद वासिमही ११ धावांची भर घालून माघारी गेला. निम्मा संघ माघारी गेल्यानंतर अनुभवी शोएब मलिकने पाकिस्तानचा डाव सावरत धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. त्याच्या जोडीला आलेल्या आसिफ अलीने टीम साऊदीला पाठोपाठ दोन षटकार मारत धावा आणि चेंडूतील अंतर बरेच कमी केले.

त्यानंतर शोएब मलिकने सामना आवाक्यात आणला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी स्वैर मारा केल्यामुळे सामना त्यांच्या हातातून निसटला. अखेर आसिफने ट्रेंड बोल्ट टाकत असलेल्या १९ व्या षटकात षटकार आणि त्यानंतर विजयी दोन धावा घेत सामना संपवला. पाकिस्तानने आपल्या ग्रुपमधील दोन मोठ्या संघांना मात देत गुण तालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले.

पाकिस्तानी गोलंदाजांचा पुन्हा प्रभावी मारा ( PAK vs NZ )

तत्पूर्वी, टी २० वर्ल्डकपमध्ये आजच्या पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ( PAK vs NZ ) न्यूझीलंडने आपल्या डावाची सुरुवात आक्रमक करण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्टिन गुप्टील आणि डॅरेल मिशेलला फक्त ३६ धावांची सलामी देता आली. गुप्टील १७ धावा करुन बाद झाला.

त्यानंतर २० चेंडूत २७ धावा करणाऱ्या मिशेलही संघाचे अर्धशतक धावफलकावर लागल्यानंतर माघारी परतला. यानंतर येणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना फार काळ टिकाव धरता आला नाही. संघाची मदार असलेला केन विल्यमसन देखील २५ धावांवर धावबाद झाला. विल्यमसन बाद झाला त्यावेळी न्यूझीलंडच्या १३ षटकात ९० धावा झाल्या होत्या.

विल्यमसननंतर आलेल्या कॉनवॉय ( २७ ) आणि ग्लेन फिलिप्स ( १३ ) यांनी न्यूझीलंडला शतक पार करुन दिले. हॅरिस रॉफने एकाच षटकात या दोघांना बाद करुन स्लॉग ओव्हरमध्ये न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. त्यानंतर न्यूझीलंडने रडत खडत १३४ धावांपर्यंत पोहचला. पाकिस्तानकडून हॅरिस रॉफने २२ धावात ४ विकेट घेतल्या. त्याला शाहीन, वासिम आणि हाफीजने प्रत्येकी १ विकेट घेत चांगली साथ दिली.

Back to top button