Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांना ‘पोक्सो’तून ‘क्लीन चिट’?

Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांना ‘पोक्सो’तून ‘क्लीन चिट’?

Published on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेले भारतीय कुस्ती संघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष, खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुरुवारी (दि. 15) दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. दोन वेगवेगळ्या न्यायालयांत पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले असून, यातील एका प्रकरणात मात्र पोलिसांनी सिंह यांना 'क्लीन चिट' दिल्याचे कळते. (Brij Bhushan Singh)

सहा महिला कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी राऊज एव्हेन्यू न्यायालयात एक हजार पानी आरोपपत्र दाखल केले. तर, अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पटियाला हाऊस न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी पुरेसे पुरावे नसल्याकारणाने 'पोक्सो' गुन्हा रद्द करण्यासाठी अहवाल दाखल दिला आहे. 4 जुलैला याप्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. (Brij Bhushan Singh)

7 महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी दिल्ली पोलिस दलात बृजभूषण यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली होती. तक्रारीनंतर 28 एप्रिल रोजी पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. 6 कुस्तीपटूंच्या तक्रारीच्या आधारे एक गुन्हा, तर 1 अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून 'पोक्सो' दाखल करण्यात आला होता.

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आयपीसी कलम 354, 354 डी, 345 ए अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच 'पोक्सो' प्रकरणात कथित पीडिता आणि पीडितेच्या वडिलांच्या विधानाच्या आधारावर अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहितीदेखील दिल्ली पोलिस जनसंपर्क अधिकारी सुमन नलवा यांनी दिली आहे.

'पोक्सो' म्हणजे काय?

बृजभूषण यांच्याविरोधात तक्रार करणार्‍या मुलींपैकी एकजण अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर 'पोक्सो'चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लैंगिक अत्याचारांपासून 18 वर्षांखालील मुला-मुलींचे संरक्षण करण्याच्या हेतूने 2012 मध्ये 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स' म्हणजेच पोक्सो कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार किमान शिक्षा दहा वर्षे तर कमाल जन्मठेपेची (प्रसंगी फाशी) तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात जामीन मिळणेही मुश्कील आहे. शिवाय, जलदगती न्यायालयात खटला चालविला जातो. त्यामुळे न्यायही जलद मिळतो.

'पोक्सो'साठी पुरावे नाहीत

'पोक्सो' प्रकरणात तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या तपासाअंती कुठलेही पुरावे मिळाले नाही, असे 550 पानी अहवालातून पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यानुसार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील 'पोक्सो' अंतर्गत दाखल गुन्हा हटवण्याची शिफारस पोलिसांनी केली आहे. तक्रारकर्ती पीडितेच्या वडिलांनी तसेच पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news