Asia Cup 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर संकट! PCB ला झटका

Asia Cup 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर संकट! PCB ला झटका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup 2023 : संपूर्ण जग भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट सामन्याची वाट पाहत आहे. हे दोन्ही संघ फक्त आयसीसी (ICC) आणि एसीसी (ACC) टूर्नामेंटमध्ये एकमेकांसमोर येत असले तरी आता या स्पर्धांमधील सामन्यांवर संकट आले आहे. आशिया चषक 2023 या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल अशी शक्यता आहे. पण स्पर्धेचे स्थळ अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे आपसूकच सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे आशिया कपमध्ये कोणते संघ खेळणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामन्याबाबत अशी एक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे केवळ भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांचीच नव्हे, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार आहे. आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना होण्याची शक्यता आता धुसर झाली आहे. हा महामुकाबला होणार नसल्याचे चित्र जवळपास स्पष्ट होत आहे.

आशिया चषकाचे (Asia Cup 2023) सामने श्रीलंकेत खेळवले जाणार?

एकदिवसीय आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेचे प्रस्तावित ठिकाण पाकिस्तान आहे. ताज्या माहितीनुसार आशिया चषक आता पाकिस्तान किंवा यूएईमध्ये नव्हे तर श्रीलंकेत खेळवला जाईल अशी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या प्रस्तावित हायब्रीड मॉडेललाही फाटा देत ही स्पर्धा दुस-याच देशात खेळवण्यात यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक हायब्रीड मॉडेल सादर केले होते. ज्याप्रमाणे आशिया कपमधील पाकिस्तान आणि इतर संघांचे सामने पाकिस्तानात, तर टीम इंडियाचे (Team India) सर्व सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जातील अशी योजना आखण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडिया क्रिकेट सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात जाऊ शकत नाही, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. परंतु बीसीसीआयने हायब्रिड मॉडेललाही स्पष्टपणे नकार दिला आहे. दरम्यान, पीसीबीने म्हटलंय की जर त्यांचे हायब्रीड मॉडेल स्वीकारले नाही तर ते आशिया कपवर बहिष्कार टाकतील. आता 'द टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार आशिया कप 2023 श्रीलंकेत खेळवला जाऊ शकतो. याचा अर्थ पाकिस्तान त्यातून बाहेर पडेल. ज्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामनाच चाहत्यांना पहायला मिळणार नाही.

पीसीबीला बसणार मोठा फटका

आयपीएल 2023 च्या फायनल (ipl final) दरम्यान बीसीसीआयचे (bcci) सर्व उच्चपदस्थ अधिकारी अहमदाबादमध्ये उपस्थित होते. त्यावेळी पाकिस्तान वगळता इतर क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना तिथे आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे आशिया चषक श्रीलंकेतच (sri lanka) खेळवला जावा असा निर्णय याचदरम्यान झालेल्या गुप्त बैठकीत घेण्यात आल्याचे मानले जात आहे. त्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडला आहे. दरम्यान, आयसीसीचे अधिकारी सध्या पाकिस्तानमध्ये आहेत आणि ते 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक (odi world cup) स्पर्धेत पाकिस्तानी संघाला भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आशिया चषक श्रीलंकेत आयोजित केला गेला आणि पाकिस्तान त्यात सहभागी झाला नाही, तर पीसीबी एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यासही नकार देईल अशी दाट शक्यता आहे. पाक मीडियानुसार, बीसीसीआय आणि पीसीबी (pcb) यांच्यातील समझोता कराराला अंतिम रूप देण्यासाठी आयसीसी जोरदार प्रयत्न करत आहे.

श्रीलंकेत आशिया कपसाठी इतर देश सज्ज?

'द टेलिग्राफ'च्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तान वगळता एसीसीच्या उर्वरित सदस्यांनी श्रीलंकेत आशिया चषक आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) पुढील बैठकीत या निर्णयाबाबत पीसीबीला स्पष्टपणे कळवले जाईल, असे सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की, आशिया चषकाचे यजमानपद मिळाल्यानंतरही पीसीबी त्यांच्या प्रस्तावाला पाठिंबा मिळवण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. यानंतर आता श्रीलंकेत स्पर्धा आयोजित करण्याच्या निर्णयाचे पालन करण्याशिवाय किंवा ती पूर्णपणे मागे घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

चार संघांमध्ये रंगणार आशिया चषक?

जर पाकिस्तान क्रिकेट संघ आशिया चषकात सहभागी झाला नाही तर भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे चार संघ आशिया कप 2023 मध्ये सहभागी होऊ शकतील. त्यामुळे आशिया चषकासाठी पात्र ठरलेल्या नेपाळ संघाला खेळण्याची संधी मिळणार नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष ग्रेग बार्कले आणि सीईओ ज्योफ अॅलार्डिस यांनी लाहोरला जाऊन पीसीबीकडून एकदिवसीय विश्वचषकातील सहभागाबाबत चर्चा केली असून बैठकीत नेमके काय झाले याचा खुलासा एक ते दोन दिवसांत होणे अपेक्षित आहे. यादरम्यान आशिया चषक स्पर्धेचे अंतिम ठिकाण आणि वेळापत्रकही जाहीर केले जाऊ शकते, असे मानले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news