पुढारी ऑनलाईन डेस्क : josh hazlewood injured : आयपीएल 2023 शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात शेवटच्या स्थानासाठी चुरस आहे. आज (21 एप्रिल) आरसीबीचा शेवटचा साखळी सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना आरसीबीसाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. पण आता आरसीबी संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, आरसीबीचा स्टार वेगवान जोश हेजलवूड जखमी झाला आहे. यामुळे तो गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. हेजलवूडच्या घोट्याला दुखापत झाल्याचे समजते आहे. आरसीबीचे संचालक माईक हेसन यांनी सांगितले की, हेजलवूड मायदेशी परतणार आहे. आता या स्टार वेगवान गोलंदाजाचे प्लेऑफपूर्वी बाहेर पडणे आरसीबीसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही.
RCB संघाने IPL 2022 मेगा लिलावात जोश हेझलवूडला 7 कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएल 2022 मध्ये त्याने आरसीबीसाठी 12 सामन्यात 20 विकेट घेतल्या. यानंतर, आयपीएल 2023 च्या सुरुवातीला तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याने 1 मे रोजी IPL 2023 मध्ये पहिला सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध खेळला. मात्र आता तो पुन्हा जखमी होताच आरसीबीच्या अडचणी वाढल्या आहेत.
जोश हेझलवूड डावाच्या सुरुवातीला चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्याने आरसीबीसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याने आयपीएलच्या 27 सामन्यात एकूण 35 विकेट घेतल्या आहेत. तो 2020 पासून आयपीएलमध्ये भाग घेत आहे. आता त्याच्यापुढे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी तंदुरुस्त होण्याचे आव्हान आहे.