Oman vs PNG T20 World Cup : यजमान ओमानचे विजयी नमन | पुढारी

Oman vs PNG T20 World Cup : यजमान ओमानचे विजयी नमन

अल अमिरात ; वृत्तसंस्था : यजमान ओमानने टी-२० विश्वचषक (Oman vs PNG T20 World Cup) स्पर्धेची सुरुवात विजयासह केली आहे. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात त्यांनी पापुआ न्यू गिनीचा (पीएनजी) 10 गडी राखून पराभव केला. ओमानचा कर्णधार जीशान मकसूदने नाणेफेक जिंकून पीएनजी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

पीएनजी संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 129 धावांच करू शकला. ओमानने 13.4 षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. जतिंदर सिंगने नाबाद 73 धावा केल्या. तर, दुसरा सलामीवीर आकिब इलियासने नाबाद 50 धावा केल्या.

130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आकिब आणि जतिंदरने ओमानला चांगली सुरुवात दिली. ‘पॉवर प्ले’मध्येच संघाने कोणतीही विकेट न गमावता 46 धावा जोडल्या. यानंतर या दोघांनी 12 व्या षटकातच 100 चा आकडा पार केला. जतिंदरने षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 12 व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूंवर षटकार ठोकला आणि वैयक्तिक धावसंख्या 55 धावा केली. त्यानंतर आकिबनेही डावाच्या 14 व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूंवर आपले अर्धशतक पूर्ण केले.

तत्पूर्वी, ओमानचा कर्णधार जीशानने अवघ्या 20 धावांत 4 बळी घेतले. त्याला ‘सामनावीर’ म्हणूनही गौरवण्यात आले. पीएनजी कर्णधार असद वाला याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 43 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. असदने चार्ल्स अमिनी (37) सोबत तिसर्‍या विकेटस्साठी 81 धावा जोडल्या.

संक्षिप्त धावफलक (Oman vs PNG T20 World Cup)

पापुआ न्यू गिनी : 20 षटकात 9 बाद 129. (असद वला 56, चार्लस एमिनी 37, झीशान मकसूद 4/20)

ओमान : 13.4 षटकांत बिनबाद 131. (आकिब इलियास नाबाद 50, जतिंदर सिंग नाबाद 73.)

Back to top button