Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची निवड; एक पाऊल पुढे की एक पाऊल मागे?

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची निवड; एक पाऊल पुढे की एक पाऊल मागे?
Published on
Updated on

अजिंक्य रहाणे हा खरं तर तंत्रशुद्ध खेळावर भर देणारा एक मेहनती खेळाडू. जितकी मेहनत तो आपल्या तंत्रावर घेतो, तितकीच मेहनत तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यावर घेतो. वास्तविक, जानेवारी 2022 मधील केपटाऊन कसोटीनंतर मुख्य प्रवाहातून डावलला गेल्यानंतर आणि मुख्य करारातून देखील डच्चू मिळाल्यानंतर रहाणेची कारकीर्द इतिहासजमा झाल्याचे संकेत होते. पण, प्रत्यक्षात रहाणेने पुन्हा एकदा आपल्या शैलीत सुधारणा केल्या, तंत्रात व्यापक फेरबदल केले व आयपीएल गाजवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप संघात स्थान संपादन करण्यातही यशस्वी ठरला. आता रहाणेच्या निवडीवरून बरेच मतप्रवाह असून त्याची ही निवड भारतीय क्रिकेटसाठी एक पाऊल पुढे की एक पाऊल मागे, अशी चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, या प्रश्नाचे बिनचूक उत्तर मिळेल ते ओव्हलवर 7 जूनपासून खेळवल्या जाणार्‍या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्येच! (Ajinkya Rahane)

खडूस मुंबईकर फलंदाजांच्या यादीत आघाडीवर असलेल्या काही दिग्गज फलंदाजांपैकी एक म्हणजे डोंबिवलीकर अजिंक्य रहाणे. मूळ अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला हा अव्वल खेळाडू पुन्हा एकदा फलंदाजीतील गतवैभवाच्या पाऊलखुणा दाखवण्यासाठी सुसज्ज झाला आहे. (Ajinkya Rahane)

आपल्या दुसर्‍या रणजी हंगामात 1089 धावांची आतषबाजी करणार्‍या रहाणेने मुंबईला 38 वे जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. 2007-08 मध्ये इंग्लंड लायन्स अ‍ॅटॅकविरुद्ध ग्रॅहम ओनियन्स, मॉन्टी पानेसर, स्टीव्ह कर्बी व लियाम प्लंकेटसारख्या दिग्गजांना सामोरे जाताना त्याची 172 धावांची खेळी विशेष कौतुकास्पद ठरली होती. आपल्या तिसर्‍याच कसोटीत दर्बानमध्ये दोन्ही डावांत अर्धशतके, वेलिंग्टनमध्ये अनिर्णीत कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध शतक, लॉर्डस्वर 28 वर्षांनी पहिला विजय मिळवून देताना पहिल्या डावात शतक, एजबस्टनमध्ये वन डे शतक असे अनेक पराक्रम रहाणेने पहिल्या टप्प्यात गाजवले. अ‍ॅडलेड कसोटीत भारताचा डाव 36 धावांत खुर्दा झाल्यानंतर विराटला मायदेशी परतावे लागले. त्यानंतर भारताला जोरदार मुसंडी मारून देणारा रहाणेच होता.

अ‍ॅडलेड व बि—स्बेनमधील अर्धशतके, मेलबर्नमध्ये 147 धावांची खेळी ही विदेशी भूमीत रहाणेची फलंदाजीतील नजाकत ठासून भरलेली गुणवत्ता दाखवून गेली. विश्वचषकात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलावहिला विजय मिळवला, त्यावेळी याच रहाणेची 79 धावांची खेळी त्यात निर्णायक ठरली होती. अर्थात, नंतर कारकिर्दीचा दुसरा टप्पा सुरू होता होता याच रहाणेच्या धावा आटल्या. अगदी धोनीने सुद्धा रहाणेला स्ट्राईक रोटेट करता येत नाही, असे निरीक्षण नोंदवले आणि रहाणे मुख्य प्रवाहातून केव्हा बाहेर फेकला गेला, ते कळाले देखील नाही.

अर्थात, रहाणेने यावर सखोल आत्मचिंतन केले, शैलीत आवश्यक सुधारणा केल्या आणि तो नव्या आक्रमक शैलीसह ताज्या दमाने मैदानात परतला. आजचा रहाणे गुढ फिरकीपटूंचे शॉर्ट ऑफ लेंग्थ चेंडू लाँगऑनकडे भिरकावताना दिसतो आणि जलद गोलंदाजांना अगदी सणसणीत कव्हर ड्राईव्हचे फटके लगावताना दिसून येतो. फक्त सूर्यकुमार यादवलाच स्कूपचा अवघड फटका मारता येतो, असे चित्र होते. पण, रहाणेने यावरदेखील हुकूमत प्राप्त केल्याचे दिसून आले आहे.

रॉबिन उत्थप्पा तिसर्‍या स्थानावर गोलंदाजांची समाचार घ्यायचा. त्याचीच पुनरावृत्ती धोनीने रहाणेकडून करवून घेतली. रहाणे यासाठी सक्षम आहे, हे निष्णात क्रिकेटिंग ब—ेन असणार्‍या धोनीने त्यापूर्वीच ताडले होते. वानखेडेवर 61, रॉयल्सविरुद्ध 19 चेंडूंत 31, आरसीबीविरुद्ध 20 चेंडूंत 37, ईडन गार्डन्सवर 29 चेंडूंत 71 अशी आतषबाजी करत रहाणेने देखील धोनीचा विश्वास सार्थ ठरवला. 2016 टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीत 35 चेंडूंत 40 धावा करणारा रहाणे व आता तोडफोड फलंदाजी करणारा रहाणे यात जमीन अस्मानचा फरक आहे. (Ajinkya Rahane)

आता आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे कसोटी चॅम्पियनशिप संघात स्थान मिळण्याचे समर्थन करता येणार नाही. पण, निवडकर्त्यांनी आयपीएलमधील कामगिरी पाहून नव्हे तर त्याचा व्यावसायिक क्रिकेटकडे पाहण्याचा बदललेला द़ृष्टिकोन नजरेसमोर ठेवून त्याला संधी दिली आहे, हे सर्वात लक्षवेधी! 2022 मध्ये केपटाऊन कसोटीनंतर बाहेर फेकले गेल्यानंतर रहाणेने दुलीप चषक स्पर्धेत उत्तर-पूर्वविरुद्ध व पुढे आसाम, हैदराबाद संघांविरुद्ध तीन शतके झळकावली. आता ही इतकी कामगिरी त्याला कसोटी संघात स्थान देण्यासाठी अजिबात पुरेशी नाही. पण, सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये सर्वांना बदललेला रहाणे दिसला आणि निवडकर्त्यांच्या नजरेतून तर ही बाब सुटणे शक्य नव्हते.

अर्थात, वर नमूद केल्याप्रमाणे या निवडीबाबत निरनिराळे मतप्रवाह आहेत. कसोटीत अपयशी ठरल्याने बाहेर फेकल्या गेलेल्या रहाणेला पुन्हा संधी देणे चुकीचे आहे, असे काहींना वाटते तर टिपिकल इंग्लिश हवामानात रहाणेसारखा अनुभवी फलंदाज मध्यफळीत मोलाचा वाटा उचलू शकतो, असा काहींचा कयास आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर, रहाणेची निवड एक पाऊल पुढे की एक पाऊल मागे, या प्रश्नाचे उत्तर जागतिक चॅम्पियनशिपमधील रहाणेच्या कामगिरीवरूनच मिळणार आहे!

रहाणेचे इंग्लंडमधील प्रदर्शन : कसोटी : 15, धावा : 729, सर्वोच्च : 103, अर्धशतके : 5, सरासरी : 26.03, शतक : 1.
रहाणेची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरी : कसोटी : 17, धावा : 1090, सर्वोच्च : 147, सरासरी : 37.58, अर्धशतके : 5, शतके : 2.

– विवेक कुलकर्णी

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news