T-20 World Cup competition : विजेत्याला १२.२ कोटी - पुढारी

T-20 World Cup competition : विजेत्याला १२.२ कोटी

दुबई ; वृत्तसंस्था : 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या टी-20 वर्ल्डकप (T-20 World Cup competition) स्पर्धेच्या बक्षीस रकमेची घोषणा रविवारी आयसीसीने केली. आयसीसीने जाहीर केलेल्या बक्षीस रकमेनुसार विजेत्या संघाला 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच 12.2 कोटी रुपये मिळतील, तर उपविजेत्याला 8,00,000 डॉलर म्हणजेच 6.1 कोटी आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 4,00,000 डॉलर म्हणजे 3 कोटी मिळणार आहेत. या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन डॉलर (42 कोटी) बक्षीस रकमेचे सहभागी 16 संघांमध्ये वाटप केले जाणार आहे. (T-20 World Cup competition)

सुरुवातीला पात्रता सामने खेळले जातील. त्यात आठ संघ असून, प्रत्येक गटांत 4-4 संघांचा समावेश आहे. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ ‘सुपर-12’ फेरीसाठी पात्र ठरतील. ‘सुपर-12’ फेरीत 6-6 संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. ‘सुपर 12’ फेरीनंतर दोन्ही गटांतील अव्वल प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेते 14 नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील आणि वर्ल्ड कप विजेता संघ कोट्यधीश होणार आहे.

‘सुपर-12’मध्ये प्रत्येक सामन्यात विजय मिळवणार्‍या संघाला बोनस रक्कमही दिली जाणार आहे. ‘सुपर-12’मध्ये 30 सामने होणार आहेत आणि प्रत्येकी 40 हजार डॉलर रक्कम वितरीत केली जाईल. ‘सुपर-12’मधून बाद होणार्‍या संघाला प्रत्येकी 70 हजार डॉलर मिळतील.

पात्रता फेरीत सहभागी संघ

गट 1 : श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, नामिबिया.

गट 2 : बांगला देश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान.

‘सुपर-12’ फेरीतील संघ

गट 1 – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट 1 चा विजेता आणि गट 2 चा उपविजेता.

गट 2 – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट 1 चा उपविजेता आणि गट 2 चा विजेता.

Back to top button