IPL 2023 : इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा ‘इम्पॅक्ट’ किती?

IPL 2023 : इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा ‘इम्पॅक्ट’ किती?
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : काही ठराविक अंतराने क्रिकेट (IPL 2023) प्रशासकांच्या थिंक टँकमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवण्याची तलफ येते आणि त्यावर विचारमंथन होऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात येते. प्रत्यक्ष खेळात त्याची अंमलबजावणी सुरू होते आणि त्याचे ज्याप्रमाणे पडसाद उमटतात, त्याप्रमाणे त्यात कालानुरूप बदल केले जातात. सध्या याच प्रणालीतून जात असलेला एक महत्त्वाचा नियम म्हणजे इम्पॅक्ट प्लेयर!

इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा यंदा अवलंब सुरू केला गेला असून, काही सामने झाल्यानंतर बीसीसीआयने याबाबत स्पर्धेत सहभागी सर्व फ्रँचायझी आणि कर्णधारांची मते मागवली आहेत. तूर्तास, या नियमाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया असून, भारतीय खेळाडू, कर्णधार या नियमाचा लाभ घेण्यासाठी अनुकूल दिसून आले आहेत; तर विदेशी खेळाडू, कर्णधारांची भूमिका 'वेट अँड वॉच' स्वरूपाची राहिली आहे.

तसे पाहता, इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे संघाला अधिक लवचिकता ठेवता येते. या नियमामुळे ऐन मोक्याच्या क्षणी कोणता खेळाडू मैदानावर येईल आणि त्यासाठी काय नियोजन करावे लागेल, याची शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागते. इथेच खरी मेख लपलेली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला हा नियम फारसा रूचला नसल्याचे त्याच्या प्रतिक्रियेवरून जाहीर झाले होते. इम्पॅक्ट प्लेयरचा नियम गोंधळात टाकणारा आहे, असे वॉर्नर त्यावेळी म्हणाला होता. बर्‍याच खेळाडू व कर्णधारांना असे वाटते की, या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंना करारबद्ध करण्यात फारसा हशील राहणार नाही. मागील काही हंगामांत सॅम करन, कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स यांच्यासाठी एकत्रित 52.25 कोटी रुपयांची बोली लावली गेली. इम्पॅक्ट प्लेयर नियम कायम राहिला, तर अष्टपैलू खेळाडूला इतकी बोली लागण्याची शक्यता बाकी राहणार नाही.

इम्पॅक्ट प्लेयर नियम कायम राहिल्यास काय फरक पडेल? (IPL 2023)

हा नियम कायम राहिला तर अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व अर्थातच कमी होईल. प्रत्येक संघ हुशारीने या नियमाचा अवलंब करेल. उदाहरणार्थ, जर एखादा संघ प्रथम फलंदाजी करत असेल, तर तो परिस्थितीनुरूप अतिरिक्त फलंदाज मैदानावर उतरवेल आणि गोलंदाजीतही एखादा जादा गोलंदाज संघाबाहेर ठेवून त्याला ऐन मोक्याच्या क्षणी संधी देईल.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. इम्पॅक्ट प्लेयर आणि नाणेफेकीनंतर संघ बदलण्याची मुभा असणे निश्चितच लाभदायक ठरू शकते, असा त्याचा दावा आहे.

आता फलंदाजीत इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा किती लाभ होईल, हे सांगणे कठीण आहे. कारण, एखादा दिवस खराबच असेल तर 6-7 सोडा, अगदी सर्व 11 फलंदाजांनी अनुभव पणाला लावला तरी काहीही होऊ शकणार नाही; पण एका चेंडूवर 4-6 धावा करायच्या असतील आणि अशावेळी एखादा हुकमी एक्का मैदानात पाठवता येत असेल, तर या नियमासारखा दुसरा पाठीराखा नसेल.

खेळपट्टीमुळे काय फरक पडू शकतो?

एरव्ही टी-20 क्रिकेटसाठी फ्लॅट विकेटस्ना पसंती दिली जाते. त्यामुळे सर्व संघदेखील आपले सर्वोत्तम गोलंदाज अंतिम एकादशमध्ये उतरवतात. एखादा गोलंदाज इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानावर येऊन पूर्ण सामन्याचे चित्रच बदलू शकत असेल, तर अशा परिस्थितीत हा नियम अधिक रंजक ठरू शकतो. अव्वल दर्जाचे क्रिकेट आणि सध्याचे टी-20 क्रिकेट यात बराच फरक पडला आहे. समोर येईल, त्या प्रत्येक चेंडूवर तोडफोड फलंदाजी करणे, हे एकच समीकरण असलेल्या या छोटेखानी क्रिकेट प्रकारात इम्पॅक्ट प्लेयर नियमाचे भविष्य कसे असेल, हे खरोखरच रंजक असणार आहे.

काय आहे इम्पॅक्ट प्लेयर नियम?

कोणताही संघ अंतिम एकादशमधील एक संघ अगदी मोक्याच्या क्षणी बदलू शकतो, हा आहे इम्पॅक्ट प्लेयरचा नियम. सर्वसाधारणपणे हा खेळाडू भारतीय असावा लागतो. मात्र, एखाद्या संघाने अंतिम एकादशमध्ये 4 ऐवजी तीनच खेळाडू खेळवले असतील, तर त्यांना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून विदेशी खेळाडू उतरवता येतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news