Virat Kohli IPL Records : कोहलीने रचले पाच ‘विराट’ रेकॉर्ड!

Virat Kohli IPL Records : कोहलीने रचले पाच ‘विराट’ रेकॉर्ड!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli IPL Records : विराट कोहलीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने मुंबई इंडियन्सला घाम फोडला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव केला. रविवारी खेळाण्यात आलेला हा हायव्होल्टेज सामना अक्षरश: एकतर्फी झाला. ज्यात आरसीबीचे पारडे सुरुवातीपासून जड राहिले. विराटने आपल्या फलंदाजीने सर्वांचे मनोरंजन केले. त्याने 49 चेंडूंत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 82 धावांची नाबाद खेळी साकारली आणि आपल्या नावावर अनेक विक्रमांची नोंद केली.

विराट कोहलीने आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिससोबत 148 धावांची भागीदारी करत मुंबईच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला. याशिवाय भारताच्या रन मशिनने या सामन्यात 6 चौकार आणि पाच षटकार मारून एक अनोखा विक्रम केला ज्यात त्याने शिखर धवनला मागे टाकले. विराटचे आयपीएल कारकिर्दीतील हे 45 वे अर्धशतक ठरले. त्याच्या नावावर पाच शतकेही आहेत. या प्रकरणातही त्याने एक विक्रम रचला आहे. आयपीएलमध्ये ओपनिंगला येत विराटच्या बॅटने धावांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळेच तो या यादीतील एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे. (Virat Kohli IPL Records)

कोहलीच्या 'विराट' विक्रमांची यादी (Virat Kohli IPL Records)

1. विराटने आयपीएलमध्ये 50 + धावांचे (45 अर्धशतके आणि 5 शतके) अनोखे अर्धशतक पूर्ण केले. या यादीत त्याने शिखर धवन (49)ला मागे टाकले. फक्त तो केवळ डेव्हिड वॉर्नरच्या (60) मागे राहिला आहे. विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत 224 सामन्यांच्या 216 डावांमध्ये सर्वाधिक 6706 धावा केल्या आहेत. तो 33 वेळा नाबाद राहिला आहेत.

2. आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून 3000 धावा पूर्ण करणारा विराट हा 7 वा फलंदाज ठरला आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून त्याच्या नावावर आता 3054 धावा जमा झाल्या आहेत. या यादीत शिखर धवन 5877 धावांसह अव्वल स्थानावर आहे.

3. आयपीएलमधील षटकारांच्या बाबतीत विराट कोहलीने किरॉन पोलार्डची बरोबरी केली. दोघांनी आता 223 षटकार नोंदवले आहेत. या यादीत ख्रिस गेल 357 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. तर पोलार्ड आणि कोहली संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत.

4. कोहली आता मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक 909 धावा करणारा फलंदाज बनला आहे. एकाच सामन्यात त्याने शिखर धवन (871), केएल राहुल (867) आणि सुरेश रैना (850) यांना मागे टाकले.

5. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांच्या नावावर मुंबई इंडियन्सविरुद्ध चौथ्या क्रमांकाची सलामीची भागीदारी रचण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. अॅडम गिलख्रिस्ट आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या जोडीने 2008 मध्ये नाबाद 155 धावा केल्या होत्या.

मुंबईविरुद्ध आरसीबीचा हा 14 वा विजय

खराब सुरुवातीनंतर टिळक वर्माच्या नाबाद 84 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पहिल्या डावात 7 बाद 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने धमाकेदार सुरुवात केली आणि 16.2 षटकात 2 गडी गमावून 172 धावा केल्या. आयपीएलमधील मुंबईविरुद्ध आरसीबीचा हा 14 वा विजय ठरला. दोन्ही संघांनी एकूण 31 सामने खेळले आहेत. त्याचबरोबर बंगळुरूच्या मैदानावर 2018 नंतर आता आरसीबीने मुंबईविरुद्ध विजय मिळवला आहे. मुंबईविरुद्धच्या 11 सामन्यांमधला हा संघाचा तिसरा विजय आहे. यापूर्वी 2013 आणि 2018 मध्ये आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध या मैदानावर विजय मिळवला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news