पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव करत इतिहास रचला. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. यापूर्वी, आशिया चषक 2022 मध्ये दोन्ही संघ आमने सामने आले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 1 विकेटने पराभव केला होता.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 92 धावांच करता आल्या. यामध्ये इमाद वसीमने सर्वाधिक १८ धावांची खेळी केली. याशिवाय सॅम अय्युबने 17, तैयब ताहिरने 16 आणि कर्णधार शादाब खानने 12 धावा केल्या. उर्वरित फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत.
धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 17.5 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. संघाकडून मोहम्मद नबीने 38 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला.
या सामन्यात अफगाणिस्तानकडून उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. यामध्ये मुजीब उर रहमानने 4 षटकात केवळ 9 धावा देऊन 2 बळी घेतल तर फजलहक फारुकीने 4 षटकात 13 धावा देऊन 2 बळी घेतले. मोहम्मद नबीने 3 षटकात 12 धावा देऊन 2 बळी घेतले. याशिवाय अजमतुल्ला उमरझाई, नवीन उल हक आणि कर्णधार राशिद खान यांना 1-1 असे यश मिळाले.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण चार T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये 3 पाकिस्तानने आणि 1 अफगाणिस्तानने जिंकला आहे. 8 डिसेंबर 2013 रोजी टी-20 सामन्यात दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्या सामन्यात पाकिस्तानने 6 गडी राखून विजय मिळवला होता. त्याचवेळी, 2023 मध्ये अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-20 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला.
पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या T20 मध्येच सर्वात कमी धावा (92) करण्याचा लाजिरवाणा विक्रम केला. याआधी 2012 साली दुबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान संघाच्या नावावर 74 धावा होत्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानची ही पाचवी सर्वात कमी धावसंख्या आहे.