Gary Ballance : क्रिकेटर एक पण दोन देशांसाठी झळकावले शतक! ‘या’ खेळाडूची ऐतिहासिक फलंदाजी | पुढारी

Gary Ballance : क्रिकेटर एक पण दोन देशांसाठी झळकावले शतक! ‘या’ खेळाडूची ऐतिहासिक फलंदाजी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Gary Ballance : झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (ZIM vs WI) एक आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. वास्तविक, झिम्बाब्वेकडून खेळताना गॅरी बॅलेन्सने असे काही केले आहे ज्याची क्रिकेट जगतात जोरदार चर्चा रंगली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बॅलन्स हा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याच्या नावावर कसोटीत दोन देशांसाठी शतक झळकावण्याची नोंद झाली आहे. गॅरी बॅलन्स हा झिम्बाब्वेसाठी पदार्पण करण्यापूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघातून खेळताना शतक झळकावण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे. आता त्याने कसोटी क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेसाठी शतक फटकावून इतिहास रचला आहे.

गॅरी बॅलन्सपूर्वी (Gary Ballance) केवळ केपलर वेसेल्स या माजी क्रिकेटरने असा पराक्रम केला होता. तो दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासाठी कसोटी खेळला असून त्याला दोन्ही संघांसाठी शतके झळकावण्यात यश आले. आता गॅरी बॅलेन्सने असा पराक्रम करून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

गॅरी बॅलन्सने (Gary Ballance) 2014 आणि 2017 या वर्षांमध्ये इंग्लंडसाठी 23 कसोटी सामने खेळले. तो इंग्लंडसाठी कसोटीत 1000 धावा करणारा तिसरा वेगवान फलंदाज होता. पण 2017 नंतर त्याचा फॉर्म खराब होऊ लागला आणि त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. 2015 मध्ये इंग्लंडकडून खेळताना बॅलन्सने यापूर्वी कसोटीत शतक झळकावले होते.

डिसेंबर 2022 मध्ये त्याने झिम्बाब्वेसाठी खेळण्याची घोषणा केली. खरं तर, बॅलन्सचा जन्म झिम्बाब्वेमध्ये झाला होता. अशा स्थितीत इंग्लंडमध्ये आपली कारकीर्द मोठी करू न शकल्यानंतर बॅलन्सने झिम्बाब्वेकडून कारकिर्दीला पुन्हा सुरुवात केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेने पहिल्या डावात 379 धावा करून डाव घोषित केला, ज्यामध्ये बॅलन्सने 231 चेंडूत नाबाद 137 धावा केल्या. बॅलन्सने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार मारले.

 

हेही वाचा :

Back to top button